नवी दिल्ली: आधीच नोटाबंदीमुळे नागरिक हैराण असताना नागरिकांच्या खिशावर आणखी भार पडणार आहे. केंद्र सरकारने गुरूवारी घरगुती गॅस सिलिंडरच्या (एलपीजी) दरात २ रुपये ७ पैशांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच विमानांसाठी लागणाऱ्या इंधनाचे दर ३.७ टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर जास्तीचा भार पडणार आहे.

यापूर्वी ३१ ऑक्टोबर रोजी विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या दरात ३८ रूपये ५० पैशांनी वाढ करण्यात आली होती. सध्या एका ग्राहकाला वर्षाला ९ अनुदानित सिलिंडर मिळतात. त्यामुळे दहावा सिलिंडर विकत घेताना दरवाढीचे अतिरिक्त पैसे मोजावे लागतात.

तर त्याआधी जुलै महिन्यात विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत घट करण्यात आली होती. त्यावेळी सिलिंडरच्या किंमतीत ११ रुपयांची कपात करण्यात आली होती. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या दरातील वाढ-घट विचारात घेऊन दर महिन्याला तेल कंपन्या पेट्रोल, डिझेल, सिलिंडर तसेच विमान इंधनाचे दर जाहीर करीत असतात.