मुंबई: नोटाबंदीनंतर नागरिकांना बॅंकांमधून पैसे काढण्यासाठी अडचणी येत आहेत. एटीएमबाहेरील रांगा अजूनही कमी होत नसून नोटाबंदीनंतर पहिल्यांदाच नोकरदारांचा पगार झाला. पण एटीएममधील पैशांचा तुटवडा आणि लांब रांगा यामुळे पैसे असूनही लोकांना त्रास होतो आहे. अशातच एचडीएफसी बॅंकेने नागरिकांच्या सोयीसाठी एक ऑफर आणली आहे. एचडीएफसीच्या या ऑफरनुसार अंतर्गत तुम्ही आता रिटेन स्टोअरमधूनही पैसे काढू शकता. एचडीएफसी बँकेने फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन या दुकान मालकांच्या संघटनेसोबत टायअप केलं आहे.

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर बँका आणि एटीएमबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. मात्र, नव्या नोटांच्या तुटवड्यामुळे अनेकांना रिकाम्या हाती परतावं लागतं. तर अनेक एटीएममधून केवळ २०००ची नोटच निघत असल्याने सुट्टे पैशांचीही अडचण निर्माण होते. त्यामुळेच आता एचडीएफसीने स्वाईप मशिनच्या धर्तीवर ग्राहकांना रिटेल दुकानांमधून पैसे काढण्याची सुविधा दिली आहे.

एचडीएफसी बँकेने परिपत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे. महानगरातील ५० पेक्षा जास्त मोठ्या दुकानांमध्ये डेबिट कार्ड स्वाईप करुन ग्राहक २००० हजार रुपये काढू शकतात, असं एचडीएफसी बँकेतर्फे सांगण्यात आलं आहे. ही सुविधा एचडीएफसीसह इतर बँकांच्या ग्राहकांना उपलब्ध असेल.

कोणत्या दुकानांमध्ये काढाल पैसे?

रुपम, बेन्झर, अमरसन्स, कलानिकेतन, प्रेमसन्स, एशियाटिक, लिबाज, सिझन, मेट्रो, कॅटवॉक आणि मोची या दुकानातून ग्राहक डेबिट कार्ड स्वाईप करुन पैसे काढू शकतात.