मुंबई: रिलायंस जिओची मोफत सर्व्हिस ४ डिसेंबरनंतर बंद होणार असल्याच्या बातमीला खोटं ठरवत रिलायंस जिओने युजर्ससाठी आणखी एक धमाकेदार बातमी दिली आहे. रिलायंस इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी दिलेल्या माहितीनुसार आता रिलायन्स जिओ हॅप्पी न्यू इयर ऑफर सुरू केली आहे. त्यानुसार रिलायन्स जिओ ग्राहकांना आता ४ जी सेवा ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे मोफत वापरता येणार आहे.

रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या जिओ वेलकम ऑफर अंतर्गत ३१ डिसेंबरपर्यंत ४ जी सेवा मोफत मिळणार होती. आता जिओ हॅप्पी न्यू इयर ऑफरअंतर्गत ३१ मार्चपर्यंत ४ जी सेवा मिळणार आहे. आधीच्या ऑफरनुसार रिलायन्स जिओची ऑफर ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत होती. मात्र आता ती मुदत मार्च २०१७ पर्यंत वाढवण्याचे रिलायन्स कम्युनिकेशननं संकेत दिले होते. दरम्यान, जिओच्या ग्राहकांना समाधानकारक सेवा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत त्यांच्याकडून पैसे घेणं योग्य ठरणार नाही, असेही ते म्हणाले.

ग्राहकांना सेवेबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे ग्राहकांना मनसोक्त सेवेचा आनंद लुटता येत नाहीये. याबाबत आम्ही भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) आणि केंद्र सरकारला कळवलं आहे. तसेच जिओची वेलकम ऑफर वाढवण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या परवानगीची गरज नसल्याचं रिलायन्स जिओचे स्ट्रेटजी प्लाइंग हेड अंशुमन ठाकूर म्हणाले होते.

कंपनीचे सल्लागारही जिओ वेलकम ऑफर मार्च 2017पर्यंत वाढवण्याचा सल्ला देत असल्यानंच जिओ वेलकम ऑफर 3 महिन्यांपर्यंत वाढवण्याचे संकेत रिलायन्स कम्युनिकेशन्सनं दिले आहेत. तसेच जिओला लाइफ टाइम फ्री कॉलिंग स्कीममध्ये ट्रायकडून हिरवा कंदील मिळाला आहे.