पंतप्रधान मोदींना नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर आज पहिल्यांदा नोकरदारांच्या बँक खात्यात पगार जमा होणार आहे. मात्र असं असलं तरीही बँक खात्यामधून पैसे काढण्यावरील निर्बंध अद्याप कमी केलेले नाहीत. त्यामुळे आठवड्याला फक्त बँक खात्यातून २४ हजार रुपयेच काढता येणार आहे. पैसे खात्यात जमा असूनही नोकरदारांना याचा प्रचंड त्रास होणार आहे.

त्याचप्रमाणे एटीएममधून एका वेळी तुम्ही केवळ अडीच हजार रुपयेच काढू शकता. त्यामुळे खात्यात पगार असला तरी तो काढण्यावर निर्बंध असल्याने नोकरदारांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे. नोटाबंदीचा आज २२ वा दिवस आहे. पगार आज जमा होणार असल्याने बँक आणि एटीएमबाहेर लागणाऱ्या रांगा आणखी मोठ्या होण्याची शक्यता आहे.

नोटाबंदीनंतरच्या पहिल्या पगारासाठी मोठी तयारी केली आहे. देशभरातील २ लाखांपैकी १ लाख ७० हजार एटीएम  अपडेट झाले आहेत. म्हणजेच आज ९० टक्के १ लाख ८०  हजार एटीएममधून नव्या नोटा येण्यास सुरुवात होणार आहे. असं सगळं असलं तरीही ग्राहकांना आज पगार काढताना अनेक त्रासांना सामोरं जावं लागणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये नगद आणि बाकीचा पगार खात्यात जमा करून सरकारने त्यांचा प्रश्न मिटवला आहे.