नवी दिल्ली: नोटाबंदीनंतर आता सरकारने सोनं घरात ठेवण्यावरही निर्बंध घातले गेले आहेत. लोकसभेत संमत करण्यात आलेल्या सुधारित आयकर कायद्याच्या अनुषंगाने सरकारने काही महत्त्वाची स्पष्टीकरणे जारी केली आहेत. महिलांनी त्यांच्या घरगुती बचतीतून किंवा आधीच कर भरलेल्या उत्पन्नातून, खरेदी केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची जप्ती करण्याचा सरकारचा कसलाही विचार नाही, याबाबत पसरवल्या जात असलेल्या बातम्या या अफवा आहेत, असं आयकर विभागाने स्पष्ट केलं आहे.
सुधारित आयकर कायद्याच्या अनुषंगाने सरकारने काही महत्त्वाची स्पष्टीकरणे जारी केली त्यात सांगण्यात आले आहे की, आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात घरातील पूर्वजांपासून पिढ्यानपिढ्या असलेल्या सोन्याच्या दागिन्यांशिवाय, प्रत्येक विवाहित महिलेला ५०० ग्रॅम म्हणजे ५० तोळे, अविवाहित स्त्रीला २५० ग्रॅम म्हणजे २५ तोळे आणि पुरुषाकडे १०० ग्रॅम म्हणजे १० तोळ्यांपेक्षा जास्त सोने जप्त केलं जाऊ शकतं. म्हणजेच विवाहित महिला ५० तोळे, अविवाहित महिलांना २५ तोळे आणि पुरुष केवळ १० तोळे सोनं घरात ठेवू शकणार आहे. यापेक्षा जास्त सोन्याचे दागिने घरात असतील तर त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.

घरात सोनं ठेवण्यावर निर्बंध येऊ शकतात अशा गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्याचा निर्णय आज झाला. त्यामुळे घरात जर खूप जास्त सोनं ठेवण्याचा विचार करत असाल किंवा काळा पैसा सोन्याने पांढरा करायचा विचार करत असाल तर महागात पडण्याची शक्यता आहे. घरात पूर्वजांपासून असलेले सोन्याचे दागिने किंवा महिलांनी आपल्या बचतीतून घेतलेल्या दागिन्यांवर कसलाही टॅक्स आकारला जाणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.