नवी दिल्ली: गेल्याच आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या कपात करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात वाढ आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर प्रतिलीटर १३ पैशांनी वाढले असून डिझेलच्या किमतीत प्रतिलीटर १२ पैशांनी कपात करण्यात आली आहे.

पेट्रोल-डिझेलचे हे नवे दर ३० नोव्हेंबरच्या मध्यरात्री म्हणजेच आज मध्यरात्रीपासून लागू होतील. पंधरा दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात करण्यात आली होती. त्यावेळी पेट्रोलचे दर प्रतिलीटर १ रुपया ४६ पैशांनी, तर डिझेल प्रतिलीटर १ रुपया ५३ पैशांनी स्वस्त झालं होतं.

सप्टेंबर महिन्यापासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत जात होते. ऑक्टोबरमध्ये दोन वेळा, तर सप्टेंबरमध्येही १६ तारखेला पेट्रोल-डिझेलचे दर वाढले होते.

नोटाबंदीनंतर पेट्रोल पंपावर सुट्या पैशांची मोठी अडचण निर्माण होत आहे. २००० च्या नोटांचे सुटे दिले जात नसल्याने अनेकांना अडचणी येत आहेत. अजूनही पेट्रोल पंपावर ५०० च्या जुन्या नोटा स्विकारल्या जात आहे. त्यामुळे काहींना दिलासा मिळाला आहे.