जनधन खात्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अतिशय महत्त्वापूर्ण निर्णय घेतला आहे. जनधन खात्यातून आता महिन्याला केवळ १० हजार रुपयेच काढता येणार आहे. विशेष म्हणजे नोटाबंदीच्या निर्णयानंतर जनधन खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे जमा होत आहे. शेतकरी आणि जन धन खातेधारकांना पैशांची अफरातफर करणा-यांपासून सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं आहे. हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपासाठी घेण्यात आला आहे. खातेदाराला दहा हजारांपेक्षा जास्त पैसे काढायचे असतील तर त्याला या पैशांच्या खर्चाची संपूर्ण माहिती देणं बंधनकारक असेल, असे निर्देश आरबीआयने बँक मॅनेजर्सना दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८  नोव्हेंबर रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्याची घोषणा केली. यानंतर जनधन खात्यात एकाएकी जास्त रक्कम जमा होऊ लागले. त्यामुळे जनधन खात्याद्वारे काळा पैसा पांढरा करण्याचं काम सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु आरबीआयच्या या निर्णयानंतर जनधन खात्याच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करणाऱ्यांवर आळा बसणार आहे.

नोटाबंदीनंतर २५ कोटी जनधन खात्यांमध्ये आतापर्यंत तब्बल ६५ हजार कोटींपेक्षा जास्त रुपये जमा झाले आहे. यातील संशयित खात्यांवर अर्थ मंत्रालयाची नजर आहे. शिवाय त्यांच्यावर कधीही कारवाई होऊ शकते.