देशात कॅशलेस अर्थव्यवस्था आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने नवे पाऊल उचलले असून, त्याचाच एक भाग म्हणून आता आधार कार्डच्या सहाय्याने बँक व्यवहार करता येतील.  आधार कार्डशी संलग्न बँक खात्यातून हे व्यवहार करण्याची मुभा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर रोजी मोठ्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली होती. कॅशलेस सोसायटी निर्माण करणं, हाच या निर्णयामागचा उद्देश असल्याचे त्यांनी नुकतेच स्पष्ट केले होते, तसेच या दृष्टीने पाऊल टाकण्यास सुरूवात करावी, कोणतीही रोख रक्कम न बाळगता व्यवहार करायला शिका, असे आवाहन त्यांनी देशवासियांना केले होते. याच पार्श्वभूमीवर सरकारनेही हे नवे पाऊल उचलले आहे.
त्यानुसार, आधार कार्ड कोडद्वारे कोणतेही बिल भरण्यासाठी थेट खात्यातील रक्कम वळती करता येईल. तसेच आधार कार्डधारकांना त्यांच्या संलग्न बँक खात्यातून पैसे डेबिट किंवा क्रेडीट करण्याचा पर्यायही उपलब्ध असेल. मात्र प्रत्येक व्यवहारापूर्वी  फिंगरप्रिंट्स वा रेटिना (डोळ्याचे बुब्बुळ) स्कॅनिंग करुन व्हेरिफेकशन करणं बंधनकारक असेल. दरम्यान आधार संलग्न बँक सेवांसाठी लवकरच अँड्रॉईड मोबाईल अॅपही सुरु करण्यात येणार  असून त्या अॅपद्वारेच हे स्कॅनिंगही करता येईल.
रोख रक्कम/चलनाला दुसरा पर्याय शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे UIDAIचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ए.बी.पांडे यांनी नमूद केले. दोन व्यक्तींची बँक खाती आधारकार्डाशी जोडलेली असतील १२ अंकी क्रमांकाच्या सहाय्याने ऑनलाइन व्यवहार करता येऊ शकतो.  सध्या आधारकार्डाच्या मदतीने दिवसाला १ कोटीहून अधिक व्यवहार होता. मात्र लवकरच आम्ही ४० कोटीपर्यंत व्यवहार हाताळू शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.