बॉलीवूडचा मि.परफेक्टशनिस्ट आमिर खान त्याच्या आगामी ‘दंगल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण, दुसरीकडे त्याची पत्नी किरण राव ही चिंतेत आहे. किरणचे जवळपास एक कोटी रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे वृत्त समोर आले आहे. किरणच्या नातेवाईकांनी खार पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधी तक्रार दाखल केल्याचे कळते. पोलिसांनी कलम ३८० अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. (दंगल सिनेमातील आमिरचा Fat to Fit प्रवास (व्हिडिओ)

तक्रारीनुसार, किरण रावच्या सुमारे एक कोटी रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. वांद्र्यातील कार्टर रोड येथील घरातून ही चोरी झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी किरण रावच्या घरी काम करणाऱ्या नोकरांची चौकशी केल्याचे कळते. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

गेल्या आठवड्यात किरणला तिच्या बेडरुममधून अंगठी आणि हि-यांचा नेकलेस गायब झाल्याचे जाणवले. याप्रकरणी घरात काम करणा-या तीन जणांवर तिचा संशय होतो. गेल्या पाच-सहा दिवसांपासून त्यांना यासंबंधी प्रश्नही करण्यात आले होते. त्यामुळे तिच्या घराची काळजी घेत असलेल्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सध्या किरण ही पती आमिरसह कार्टर रोड येथील अपार्टमेंटमध्ये राहते. दरम्यान, सदर प्रकरणी किरणने कोणतीही माहिती दिलेली नाही.