चेन्नई: ब-याच मराठी सिनेमांमध्ये एकापेक्षा चांगल्या भूमिका आणि काही सिनेमांची निर्मिती केल्यानंतर अभिनेत्री-निर्माती तृप्ती भोईर लग्न बेडीत अडकली आहे. साऊथ सिने इंडस्ट्रीतील संगीतकार टी सतीश चक्रवर्ती यांच्याशी तिने लग्न केलंय. चेन्नईतील एव्हीएम मेना हॉलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.

‘अगडबम’ या सिनेमातील अगडबम या भूमिकेमुळे तॄप्ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. तृप्ती भोईरची नाजूका ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अभिनेत्री आणि निर्माती असलेल्या तृप्तीने रंगमंचापासून टीव्ही आणि सिनेमात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ती रूपेरी पडद्यापासून दूर गेली आहे. आता अचानक तिच्या लग्नाची बातमी आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

trupti-bhoir-wedding-1

सिनेमात येण्यापूर्वी तृप्ती रंगमंचावर अधिक सक्रीय होती. कॉलेजच्या दिवसात तिचा कल एकांकिका आणि नाटकांकडे होता. अभिनयाच्या जोरावर राज्यस्तरावर अनेक पुरस्कार मिळाले होते. सही रे सही या नाटकातून तिला पहिला ब्रेक मिळाला. तृप्ती कायमच आपल्या भूमिकांमध्ये प्रयोग करत असते.

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे’, ‘अगडबम’, ‘हॅलो जय हिंद’, ‘टुरिंग टॉकिज’ असे अनेक चित्रपट तृप्तीने निर्मित केल असून त्यापैकी काहींमध्ये अभिनयही केला आहे. याशिवाय ‘चार दिवस सासूचे’, ‘वादळवाट’ या मालिकांमध्ये आणि ‘इंद्राक्षी’, ‘सही रे सही’ या नाटकांमध्येही तिने काम केलं आहे.

तृप्ती भोईरचे पती टी सतीश चक्रवर्ती व्यवसायाने संगीतकार आहेत. त्यांनी तामीळमधील अनेक सिनेमांमध्ये संगीत दिलं आहे. लीलाई आणि कनिमोझी या चित्रपटातून त्यांना लोकप्रियता मिळाली. त्यांनी 2006 पर्यंत संगीतकार ए आर रहमानसोबत काम केलं होतं.