ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे सोमवारी रात्री उशिरा पुण्यात निधन झाले. यादव यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. कथा, कादंबरी, कविता, समीक्षा, वैचारिक, ललित..अशी साहित्याच्या क्षेत्रात विपुल मुशाफिरी करत, ग्रामीण जीवनाचे वास्तव वाचकांसमोर मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद रतन यादव यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे कुटुंबीयांनी सांगितले.

आनंद यादव यांच्याबद्दल –
३० नोव्हेंबर १९३५ रोजी त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे जन्म झाला होता. आनंद यादव यांनी कोल्हापूर व पुणे येथून आपले शिक्षण पूर्ण केले‌. आकाशवाणीत त्यांनी काही काळ नोकरी केली. पुणे विद्यापीठात प्रपाठक म्हणून नियुक्ती झाल्यावर तेथेच मराठी विभाग प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. लेखनातूनही निवृत्ती घेण्याचा इरादा त्यांनी २९ एप्रिल २०१३ रोजी बोलून दाखविला होता. त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रासाठी १९९० मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. आनंद यादव यांनी सुमारे ४०हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. हिरवे जग, मळ्याची माती, मायलेकरं (दी‍र्घकविता) हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला होता.

आनंद यादव यांची साहित्य संपदा
कथा : खळाळ, माळावरची मैना, घरजावई, डवरणी, आदीताल, उखडलेली झाडं, भूमिकन्या, झाडवाटा, शेवटची लढाई, उगमती मने
कवितासंग्रह : हिरवे जग, मळ्याची माती, मायलेकरं, रानमेवा – बालकविता, सैनिकहो तुमच्यासाठी
कादंबऱ्या : गोतावळा, नटरंग, एकलकोंडा, माऊली, कलेचे कातडे
आत्मचरित्र (४ खंड) : झोंबी, नांगरणी, घरभिंती, काचवेल
वगनाट्य : रात घुंघुराची
ललितगद्य : मातीखालची माती (व्यक्तिचित्रे), स्पर्शकमळे, पाणभवरे, ग्रामसंस्कृती, साहित्यिकाचा गाव

झोंबी – झोंबी म्हणजे लढाई! एकाने दुसर्‍याशी झोंबणे. ही आहे दारिद्र्याची विद्याप्राप्तीसाठी केलेली लढाई. आनंद यादवांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष म्हणजे ही आत्मचरित्रात्मक कादंबरी. या कादंबरीत फक्त शिकण्यासाठी भोगलेल्या व्यथाच आहेत असे नाही तर दरिद्री, अज्ञानी, ग्रामीण कुटुंबाचे, भीषण दारिद्र्याचे ते विश्वरूप दर्शन आहे. लेखकाचे गाव, गावातील रितीरिवाज, निसर्ग,बापाचा आडमुठेपणा,आईचा होणारा अपरिमित छळ,लागोपाठ होणारी मुले,मुलांचे अपमृत्यू,शाळेतील प्रसंग, मास्तरांचे स्वभाव,तर्‍हा,गावातले उरूस,जत्रा,गांधीवधानंतर झालेली स्थिती…अशा अनेक गोष्टींचे वास्तव चित्र आहे. या कादंबरीचा आवाका खूप मोठा आहे. झोंबी हे आत्मचरित्र कादंबरी रूपात लिहिताना आनंद यादवांनी आपली कुणी कणव करावी अशी भूमिका घेतलेली नाही. एका सहृदय चिंतनशील माणसाने आपल्या बालपणी भोगलेल्या व्यथा इथे शब्दरूप केलेल्या आहेत. वाचकांना अस्वस्थ करण्याचं प्रचंड सामर्थ्य या कादंबरीत आहे.
दारिद्र्याचे श्रीमंत चित्रण करणारी कादंबरी. ‘झोंबी’चाच पुढचा भाग म्हणून लोकांसमोर आलेल्या ‘नांगरणी’ या आत्मकथनालाही वाचकांनी डोक्यावर घेतलं. त्यानंतर ‘घरभिंती’ (१९९२) आणि ‘काचवेल’ (१९९७) ही दोन आत्मकथनंही यथावकाश प्रसिद्ध झाली. या सगळ्या आत्मकथनांचं सामायिक वैशिष्ट्य सांगायचं तर त्यात कुठेही आक्रस्ताळेपणा येत नाही की दुःखाचं भांडवल करण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसत नाही. यादव सरांच्या आधीही आणि नंतरही अनेकांनी आत्मकथनं लिहिली आहेत. पण, त्यापैकी अनेकांच्या लेखनांत आत्मप्रौढी, दुःख, संघर्ष यांचं भांडवल करण्याचाच प्रयत्न अधिक दिसून येतो. याच काळात दलित आत्मकथनंही गाजत होती. दलितांच्या वेदना, त्यांच्या वाट्याला आलेली दुःखं, डावललेपणाची भावना, या सगळ्यांचं प्रतिबिंब तत्कालीन दलित साहित्यात उमटत होतं. पण, तरीही त्याचा परिघ हा मर्यादितच होता. त्यात सर्वंकष ग्रामसंस्कृतीचा अभाव होता. ही उणीव यादव सरांच्या लेखनानं भरून काढली. ‘गोतावळा’, ‘एकलकोंडा’ या सारख्या कादंब-यातूनही याचा प्रत्यय आपल्याला येऊ शकतो. ‘खळाळ’, ‘माळावरची मैना’, ‘डवरणी’ ‘उखडलेली झाडे’, ‘झाडवाटा’, ‘उगवती मने’ या त्यांच्या कथासंग्रहांच्या नावातूनही त्यांची ग्रामसंस्कृतीविषयी असलेली आपुलकी आणि निष्ठा दिसून येते.

नटरंग – गेल्या तीन दशकांतील (1950 ते 1980) ज्या काही कादंबर्‍यांनी ठसे मराठी ललित साहित्याच्या क्षेत्रात उमटविले त्यांमध्ये आनंद यादव यांच्या ‘नटरंग’ चे यश उल्लेखनीय ठरेल. चाकोरीबाहेर जाऊन निवडलेली कलावस्तू, निवेदनाचे साधेच परंतु आशयानुकूल आणि अर्थगर्भ स्वच्छ रूप, नेमक्या प्रतिमांच्या साह्याने खुलत जाणार्‍या प्रसंगांची दीप्ती, भोवतालच्या परिसराचे मूळ कथावस्तूशी निगडीत झालेले नाते आणि संपूर्ण आशयातून व्यक्त होत गेलेली मनाची स्पंदने ही कादंबरीची वैशिष्ठ्ये आहेत. अशी दाद अनेक कादंबरीकारांनी अनेक समीक्षकांनी, अनेक वाचकांनी ‘नटरंग’ला दिली त्यामुळे मला जे काही म्हणावयाचे होते ते ‘नटरंग’च्या अनुभवाद्वारा व्यक्त झाल्याचे समाधान मिळाले.
मराठीतील एक अव्वल दर्जाची,कलात्म आणि शोकात्म कादंबरी.’नटरंग’ मध्ये आनंद यादवांच्या लेखकीय व्यक्तिमत्त्वाची बहुतेक सारी वैशिष्ट्ये प्रभावीपणे व्यक्त झाली आहेत.प्रसंगांना चित्रवत आकार देण्याची आणि संपूर्ण रसपूर्ण बनविण्याची,त्यांना मनोवैज्ञानिक स्पर्श देण्याची,प्रसंगातील कारुण्य आणि विनोद हेरण्याची लेखकाची क्षमता विलक्षण आहे.त्यामुळे कादंबरीचे वातावरण चैतन्यपूर्ण झाले आहे.
‘नटरंग’ ही एका भारतीय कलावंताची शोकांतिका.
तिला अनुभवाचे अनेक पदर आहेत.जीवनातील भयानक दारिद्र्य आणि कलात्मक उर्जा,कलावंताचे कुटुंब, आणि कलावंताचे कला-व्यक्तिमत्त्व,मातंग समाजाची रुढीग्रस्त जीवनशैली आणि तिच्या बाहेर जाऊन आत्मप्रेरणेने आणि कलानिर्मितीच्या आकांक्षेने जगू पाहणारा कलावंत,कलेचा उपयोग पोट भरू पाहण्यासाठी करू पाहणारे सहकारी आणि कलेच्या विशुद्धतेचा ध्यास घेऊ पाहणारा कलावंत,अशी संघर्षाची विविध आणि व्यामिश्र रूपे ‘नटरंग’ मध्ये एकजीव झालेली आहेत.

नांगरणी- खेड्यातील गरीब कुणबी घरातील एक मुलगा प्रतिकूल परिस्थितीतही शिकण्याची आस मनात धरुन , मिळेल तिथून मदत मिळवत व तरीही आपले स्वत्व , स्वाभिमान जपत सांभाळत आपले स्वप्न पूर्ण करतो व आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबाची परिस्थिती सुधारण्याचे ध्येय समोर ठेउन वाटचाल करतो हा अनुभव अतिशय वाचनीय व अनुकरणीय आहे. आजू बाजूच्या परिस्थितीचे, भेटलेल्या व्यक्तिंचे यथार्थ चित्रण वाचत असताना तो काळ व त्या व्यक्ती डोळ्यासमोर उभ्या रहातात व लेखकाने घेतलेला अनुभव आपल्या नकळत आपला होत जातो.
आपल्यातील कवी, लेखक हे गुण ओळखून त्यांची डोळस जोपासना व विकास मा. श्री. आनंद यादव यांनी केलेला दिसत आहे. त्यासाठी वाचन मनन व मित्रांबरोबर, शिक्षकांबरोबर चर्चा करीत स्वत: स्वत:चा घडवलेला हा विकास आहे.
या प्रवासात घडलेल्या भाव भावनांचे संयत शब्दात केलेले चित्रण इथे आहे.पण हे अलिप्त पणे केले नसून त्या त्या वेळेच्या भावनांमधे भिजत भिजत हे केल्याने या कथनाला थोडाही रूक्षपणा येत नाही व लेखकाच्या प्रवासात वाचक म्हणून सहभागी होता येते. त्याच्या वेदनेने तळमळ होते व त्यांच्या यशाने हरखून जाणेही शक्य होते. कागल, रत्नागिरी, कोल्हापूर व पुणे ते पंढरपूर असा हा स्थलप्रवास आहे. त्या त्या ठिकाणची परिस्थिती, निसर्ग, मानसिकता या सगळ्याचे मनोज्ञ चित्रण या पुस्तकात घडते.

भूमिकन्या कथासंग्रह – . या कथासंग्रहामध्ये ‘आदिजन्मातली माणसं ‘टवके उडालेला मोर’ लेक लगनाची’ जल्माचं सोनं झालं ‘ पोटूसंपण’ राखण’ कळी फुलतानाचे दिवस ‘फुटलेलं पाणी ‘बायकांचा जन्म ‘ नरमेध’ मध्यरात्रीचं चांदणं’ पांद’भूक’ अशा एकापेक्षा एक सरस चौदा कथा आहेत .प्रत्येक कथा केवळ विचारप्रवण करीत नाही तर जगण्याचे भान आणणाऱ्या , सकस अनुभूती देणाऱ्या श्रेष्ठ दर्जाच्या आहेत .ग्रामीण भागातील वास्तव चित्रण तर आहेच पण लेखकाचे अफलातून निरिक्षण दृष्टीचे दर्शन प्रत्येक कथेतून दिसते .त्यामुळे या कथा आपल्याच आजूबाजूच्या असून डोळ्यासमोर घडताहेत याची अनुभूती येते. या कथासंग्रहातील सर्वात आवडलेली कथा म्हणजे “वाकळ” ही होय. प्रचंड गाजलेली ही कथा हिंदीमधून “गुदडी” या नावाने प्रसिद्ध आहे. शहरीकरणाच्या गर्तेत सापडलेल्या पांढरपेशी व्यक्तीची अवस्था आणि घालमेल या कथेच्या प्रत्येक अक्षरातून पाझरते. कथा वाचत असताना मनात असंख्य विचारांचे काहूर तर माजतेच पण क्षणाक्षणाला मेंदू बधीर झाल्याचा अनुभव येतो . “झोंबी ” घरभिंती”काचवेल’ उखडलेली झाडे ‘मळ्याची माती’ नटरंग ” या अफलातून कलाकृतीबरोबरच “भूमिकन्या ” हा कथासंग्रहसुद्धा अतिशय ग्रेट असाच आहे.