मुंबई: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या आगामी ‘शेंटिमेंटल’ या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आलाय. या सिनेमात अशोक सराफ पोलीस हवालदाराची भूमिका साकारणार आहेत. ट्रेलरवरून हा सिनेमा नेहमीच्या कथानकांपेक्षा वेगळा असल्याचं नक्कीच वाटतंय. नक्कीच काहीतरी मजेशीर आणि अफलातून बघायला मिळणार अस ट्रेलर पाहून वाटतं.

‘शेंटिमेंटल’च्या निमित्ताने पुन्हा एकदा अशोक सराफ प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करताना दिसणार आहेत. अशोक सराफ यांचा नुकताच 4 जूनला वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘शेंटीमेंटल’ सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. ‘पोस्टर बॉईज’ आणि ‘पोस्टर गर्ल्स’ सारखे हिट सिनेमे देणारे लेखक-दिग्दर्शक समीर पाटील यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 28 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. (बघा: पोलिसांच्या आयुष्यावर आधारित ‘शेंटीमेंटल’ सिनेमाचा टीझर आऊट)

अशोक सराफ यांनी 1975 मध्ये त्यांच्या करियरची सुरुवात ‘पांडू हवालदार’ या चित्रपटाने झाली होती. या चित्रपटातील त्यांची हवालदारची भूमिका खूप गाजली होती आणि आज 42 वर्षांनंतर ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटात ते हवालदाराच्या भूमिकेतून बढती घेऊन सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या सिनेमात ते प्रल्हाद घोडके ही भूमिका साकारणार आहेत.