बॉलिवूडमधील अनेक सिनेमांवरून इन्स्पायर असलेले अनेक मराठी सिनेमे याआधीही बघायला मिळाले. मात्र केवळ इन्स्पायर होऊन केलेले सिनेमे मराठीतही तसेच वर्कआऊट होतील, असं नाहीये. ‘दगडी चाळ’ या अ‍ॅक्शन सिनेमानंतर दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांचा रोमॅंटिक ‘भेटली तू पुन्हा’ हा सिनेमा रिलीज झालाय. हा सिनेमा एका कोणत्या सिनेमावरुन इन्स्पायर असल्याचं म्हणता येणार नाही, पण अधूनमधून ‘जब वी मेट’ या सिनेमाची आठवण येत राहते. खरंतर ‘जब वी मेट’ या सिनेमासोबत ‘भेटली तू पुन्हा’ याची तुलना होऊ शकत नाही. कारण दोन्हींच्या कथामध्ये बराच फरक आहे. ‘दगडी चाळ’ सारख्या चांगल्या सिनेमानंतर कणसे यांच्या या सिनेमाकडून अपेक्षा लागल्या होत्या. मात्र त्या अपेक्षा या सिनेमातून पूर्ण होत नाही आणि मनोरंजनही होत नाही.

दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांचा ‘दगडी चाळ’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. त्यातील साऊथ सिनेमांप्रमाणे अ‍ॅक्शन, रोमान्स हे सगळंच मस्त जमून आलं होतं. त्यानंतर त्यांचा हा रोमॅंटिक सिनेमा असल्याने अर्थातच उत्सुकता होती. आणखी एक खासियत म्हणजे यात वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत ही लोकप्रिय जोडीही आहे. त्यामुळेही अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र सिनेमाची कथा उगाच फारच ताणली गेल्याने मनोरंजन होण्याऎवजी कंटाळा यायला लागतो. कधी एकदाचा सिनेमा संपतो याची वाट आपण बघायला लागतो.

भेटली तू पुन्हा ही कथा आहे पुण्यातील आलोक भावे(वैभव तत्ववादी) तरूणाची आणि अश्विनी सारंग(पूजा सावंत) या तरूणीची. आलोक लग्नाच्या वयाचा आहे. त्याची चांगली नोकरीही आहे. त्यामुळे त्याच्या घरचे लोक त्याच्या लग्नाच्या मागे लागले आहेत. सगळ्यांप्रमाणे या तरूणालाही जगावेगळी मुलगी हवी आहे. आतापर्यंत त्याने 30 च्यावर मुली पाहिल्या आहेत. मात्र सगळ्यांना नकार दिलाय. नुकताच तो अश्विनीलाही बघायला गेला होता. नेहमीप्रमाणे त्याने तिला नकार दिला. त्यानंतर गोव्या जाताना अचानक ते एकाच ट्रेनमध्ये, एकाच कम्पार्टमेंटमध्ये येतात. आता नकार दिलेली मुलगी समोरच्याच सीटवर असल्याने त्याला अघडल्यासारखं होतं. मात्र अश्विनी मनमोकळ्या गप्पा मारायला सुरूवात करते. ज्या वेडेपणाचा केवळ विचार केलाय तो सगळा ती करू लागते. सुरुवातीला आलोकला हे सगळं पटत नाही. नंतर दोघांची चांगली मैत्री होते. आलोकला ती आवडायला लागते. मात्र आता तिचं लग्न दुसरीकडे ठरलेलं असतं. असं हे कथानक…आता पुढे ती काय करते? त्यांचा हा ओळखीचा पण अनोळखी प्रवास कसा होतो? नकार दिलेल्या मुलीच्या प्रेमात आलोक कसा पडतो ? हे सगळं या सिनेमात बघायला मिळतं.

दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची कथा संजय जमखंडी यांनी चांगली लिहिली आहे. मात्र या सिनेमाच्या स्क्रीन प्लेमुळे हा सिनेमा मार्ग चुकलाय. एक वेगळी कथा असल्याचं, कलाकारांच्या चांगल्या कामामुळे बरंही वाटतं पण सिनेमा वेळ फारच ताणला गेल्याने कंटाळा यायला लागतो. त्यामुळे झालं असं की, कलाकारांची चांगली कामंही इथे उपयोगी पडत नाही. एकतर स्क्रीन प्लेमध्ये चूका आणि त्यात दिग्दर्शकाने ओढून ताणून केलेली मांडणीमुळे थोडं फिस्कटलंच, असं म्हणावं लागेल. नाहीतर एक चांगला सिनेमा तयार होऊ शकला असता. ट्रेनमधील प्रवास फारच जास्त ताणल्यासारखा वाटतो. त्यानंतर एकामागून एक येणारे ट्विस्ट, त्यांना येणा-या अडचणी त्या आपसूक आल्यासारख्या वाटत नाहीत. त्या मुद्दामहून केल्याचंही स्पष्ट दिसतं.

Untitled-91

या सिनेमाचं कास्टींग चांगलं करण्यात आलंय. वैभव तत्ववादी याने नेहमीप्रमाणे मस्त काम केलंय. पूजा सावंतच्या भूमिकेला ‘जब वी मेट’च्या करिनाच्या भूमिकेचा टच देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मात्र इथे पूजाची भूमिका फारच लाऊड झाल्यासारखी वाटते. अश्विनीचं ते लाऊड असणं कधी कधी अंगावर आल्यासारखं होतं. खूप भडक अशी ती भूमिका लिहिली गेली आहे. पण तरीही पूजाने ती भूमिका चांगली वठवण्याचा चांगला प्रयत्न नक्कीच केलाय.

एकंदर काय तर स्क्रीन प्ले जर आणखी चांगला मजबूत बांधता आला असता तर नक्कीच हा सिनेमा चांगला होऊ शकला असता. लांबीही कमी करता आली असती. कधी कधी तर असे अनेक सीन समोर येतात जिथे असं वाटतं की, आता सिनेमा संपतो. पण तसं न होता ते पुढे जात राहतं. पण त्याने मनोरंजन होण्यापेक्षा कंटाळा जास्त येतो. सिनेमातील गाणी चांगली झालीये. काही लोकेशन्सही मस्त दिसलीयेत. त्यामुळे आता हा सिनेमा बघावा की नाही ते तुमचं तुम्ही ठरवा.

रेटींग- 2 स्टार