दिग्दर्शक सुजॉय घोष याने दिग्दर्शित केलेल्या आणि विद्या बालनची मुख्य भूमिका असलेल्या ‘कहाणी’ या सिनेमाने प्रेक्षकांना थक्क करून सोडलं होतं. त्यातील कथानकाने प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवलं होतं. त्यामुळे अर्थातच ‘कहाणी २’ कडूनही त्याचप्रमाणे अपेक्षा वाढल्या होत्या. यातही विद्याच मुख्य भूमिकेत असल्याने या सिनेमाची उत्सुकता चांगलीच वाढली होती. मुळात आधीच्या ‘कहाणी’ची आणि या ‘कहाणी २’ची तुलना करणे मुर्खपणाच ठरेल कारण दोन्ही सिनेमांचे कथानक वेगळे आहेत. त्यामुळे या कलाकृतीकडे स्वतंत्रपणे बघावं लागेल. यातील कथानकाचं आधीच्या कथानकाशी काहीही देणंघेणं नाहीये. एक वेगळंच कथानक या ‘कहाणी २’मध्ये सांगण्यात आलं आहे. आधीच्या सिनेमासारखा सस्पेन्स यात असला तरीही हा सिनेमा जास्त प्रभावी ठरत नाही.

‘कहाणी’ या सिनेमाने प्रेक्षकांना भारावून सोडलं होतं. कोणताही मोठा अभिनेता नसूनही विद्याने हा सिनेमा आपल्या खांद्यावर पेलला होता. त्याच धरतीवर तिला मुख्य भूमिकेत घेऊन एक सस्पेन्स कथानक मांडण्याचा प्रयत्न या ‘कहाणी २’मधून करण्यात आला. यात पूर्णपणे वेगळं आणि एक चांगलं कथानक आहे. मात्र काही मोजक्या ठिकाणी या सिनेमाने मार खाल्ला आहे. त्यामुळे जरा अपेक्षाभंग होतोच. यातही सस्पेन्स आणि थ्रिलर आहे पण तो थेट भिडत नाही. प्रभावी ठरत नाही.

‘कहाणी २’ही कथा आहे एका महिलेची आणि तिच्या मुलीची. पण खरंतर ती महिला तिची आई नाहीये. पश्चिम बंगालच्या एका गावात हे कथानक घडतं. दुर्गा सिंग(विद्या बालन) ही एका शाळेत नोकरी करते. तिची मुलगी दोन्ही पायाने अपंग आहे. तिच्या उपचार करण्यासाठी ती धडपडत असते. एका सकाळी दुर्गा सिंग ऑफिसला जाते आणि घरी परतते तेव्हा तिची मुलगी घरात नसते. तिचं कुणीतरी अपहरण केलेलं असतं. याने घाबरलेली दुर्गा ही मुलीच्या शोधात धावत घराबाहेर पडते आणि तिचा अपघात होतो. यात ती कोमात जाते. दुर्गाला रूग्णालयात भरती करण्यात येतं. इथे एक इन्सपेक्टर येतो इंदर(अर्जुन रामपाल). दुर्गाला बघितल्यावर इंदरला धक्का बसतो. अशातच त्याला कळतं की, या महिलेवर खूनाचा आणि एका मुलीच्या अपहरणाचा आरोप आहे. अशातच या महिलेची एक डायरी इंदरच्या हाती लागते. खरंतर इथं ख-या अर्थाने कहाणीला सुरूवात होते. आणि मग पुढे त्याला जोडून काही कहाण्या पुढे येतात. ती कोमात आहे मग तिच्या मुलीला कोण सोडवतं? इंदर तिला खूनाच्या खटल्यात अटक करतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सिनेमात मिळतात.

‘कहाणी २’चं कथानक चांगलं आहे. ते मांडलंही चांगलं आहे. यात सध्या गाजत असलेला लहान मुलींच्या लैंगिक शोषणासारखा विषय हाताळण्यात आला आहे. आणि तो विषय अतिशय दमदार पद्धतीने मांडलं आहे. सुजॉय घोष हा अतिशय प्रतिभावंत दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचं सिनेमासाठीचं डिटेलिंग खूप चांगलं असतं. मात्र, इथे जरा ते रटाळ होऊन जातं. काही ठिकाणी कथानक लांबल्यासारखं वाटतं. इंटरव्हल व्हायच्या काही मिनिटांआधीच पुढील कथानक काय असणार याचा अंदाज यायला लागतो. त्यामुळे रंसभंग होतो. सगळेच अंदाज खरे ठरतात असे नाही पण स्पीडही कमी झाल्याने इंटरेस्ट कमी होऊन जातो. तर काही गोष्टी कळतच नाही. काही प्रश्नही निर्माण होतात.

बाल लैंगिक शोषण ही अलिकडे एक मोठी समस्या बनली आहे. यावर जनजागृती होतं अतिशय महत्वाचं झालं आहे. तेच या सिनेमातून मनोरंजनाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. अतिशय संवेदनशील विषय बेधडकपणे, हुशारीने यात मांडला आहे. त्यासाठी सुजॉय घोष याचं खास कौतुक करायला हवं. मात्र, पटकथा जरा आणखी चांगली बांधली असती. तर ते अधिक चांगल्याप्रकारे भिडली असती.

एकतर दुर्गा आणि इंदर यांचं लग्न झालेलं असतं. मग ते वेगळे का होतात? दुर्गावरून कोलकत्याला कशी पोहचते?, घर पेटवल्यावर घरात पोलिसांनी जळालेल्या बॉडी चेक केल्या नाही का? असे काही प्रश्न पडतात. मात्र, अर्थातच हा सिनेमा पश्चिम बंगालमध्ये घडत असल्याने बंगाली भाषेचा टच यात असणार, तो आहे. तर तिकडचं राहणीमानही बघायला मिळतं.

विद्या बालन हिने नेहमीप्रमाणे अफलातून अदाकारी केली आहे. मात्र, हा सिनेमा तिने एकटीने तारला असं म्हणता येणार नाही. कारण यात अर्जुन रामपाल यानेही तितकच चांगलं काम केलं आहे. अर्जुन ब-याच दिवसांनी एका चांगल्या भूमिकेत बघायला मिळाला आहे. दिग्दर्शनही चांगलं झालं आहे. संवादही चांगले आहेत. पटकथा आणखी मजबूत करता आली असती. कारण सुरूवातीलाच उत्सुकता वाढवणारी कथा नंतर मंदावते.

एकंदर काय तर हा सिनेमाही सुजॉय घोष स्टाईलचा सिनेमा आहे. यातही ड्रामा, सस्पेन्स आहे. कलाकारांचे दमदार काम आहे. एक वेगळं कथानक आहे. पण जास्त अपेक्षा ठेवून हा सिनेमा बघता येणार नाही. कहाणीसारखाच हा असेल असा विचार डोक्यातून काढून टाका. नाहीतर अपेक्षाभंग होऊ शकतो. मात्र यातील विषयासाठी एकदा हा सिनेमा बघण्यास काहीच हरकत नाही.

रेटींग: ३ स्टार