किंग खान अभिनेता शाहरुख खान आजतागायत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ‘दिवाना’ या चित्रपटातून बी टाऊनमध्ये पदार्पण करणाऱ्या किंग खानने आजवर विविध धाटणीच्या भूमिकांना न्याय दिला आहे. गेल्या काही काळापासून सुद्धा शाहरुख त्याच्या विविध चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये, प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. इतकेच नव्हे तर, तो त्याच्या कुटुंबालाही तेवढेच प्राधान्य देत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाच्या वाट्याला आलेले यश आणि शाहरुखच्या भूमिकेची होणारी प्रशंसा पाहता किंग खान काही दिवसांसाठी आराम करेल, किंवा सुट्टीवर जाईल असेच अनेकांना वाटत होते. पण तसे काहीही होताना दिसत नाहीये.

‘डिअर जिंदगी’ प्रदर्शित होऊन एक आठवडाही पूर्ण होत नाही तोच शाहरुख एका नव्या रुपात चाहत्यांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे आणि तेसुद्धा एका नव्या माध्यमातून. त्यामुळे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानप्रमाणेच किंग खानसुद्धा त्याच्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी शक्य त्या  सर्व नव्या मार्गांचा अवलंब करताना दिसतो आहे.

शाहरुखच्या आगामी चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच प्रकाशझोतात यायला सुरुवात केली आहे हे सर्वच जाणतात. विविध कारणांनी किंग खानचा ‘रईस’ हा चित्रपट बी टाऊनमधील विविध चर्चांचे मुळ कारण ठरत आहे. त्यामुळे या बहुचर्चित चित्रपटाद्वारे शाहरुख नक्की काय सांगू इच्छितो याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. याच उत्सुकतेचा अंदाज घेत ७ डिसेंबरला ‘रईस’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याचदरम्यान शाहरुख आणि चाहत्यांमध्ये एका परिसंवादाचे आयोजनही करण्यात आले आहे. त्यामुळे तमाम चाहत्यांना सामोरे जाण्यासाठी हा ‘रईस’ अभिनेता सज्ज झाला आहे. शाहरुखने त्याच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या चित्रपटाचा एक टिझर लॉन्च करत या परिसंवादाच्या सत्रात सहभागी होण्यासाठी चाहत्यांना आवाहन केले आहे.

एकाच वेळी सर्व ‘यूएफओ स्क्रिन्स’ द्वारे या परिसंवादाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. शाहरुखने त्याच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांना उद्देशून ‘#RaeesTrailerAaRahaHai’ असा हॅशटॅग लावत ‘ट्रेलरपूर्वी आम्ही तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आलोय. लक्ष देऊन ऐका’ असे लिहिले. शाहरुखचे असे लिहिण्यामागे नेमके काय दडले आहे आणि त्या माध्यमातून किंग खान काय सांगू इच्छित आहे असाच प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात घर करु लागला आहे. त्यामुळे या गुपितावरुन ७ डिसेंबरलाच पडदा उठेल.