पोलिसांचे प्रश्न, पोलिसांच्या समस्या, त्यांचं जगणं, त्यांचं विश्व मांडणारे काही सिनेमे हिंदीत आणि मराठीतही आले आहेत. काही शॉर्टफिल्म्सही होत्या. मात्र त्या सिनेमांमधून तितक्या प्रखरपणे किंवा नेमकेपणाने त्या विषयावर भाष्य केल्याचं अजिबात जाणवलं नाही. ते फारच वरवरच वाटलं होतं. त्याशिवाय इतर सिनेमांमध्ये दाखवलं जाणारं पोलीस डिपार्टंमेंटही तेच ते बघितलंय. मात्र आता पोलिसांच्या प्रश्नांवर-समस्यांवर, त्यांच्या स्थितीवर नेमकेपणाने भाष्य करणारा ‘शेंटिमेंटल’ सिनेमा रिलीज झालाय. त्यांच्या मुळ प्रश्नाला यातून हात घालण्यात आलाय. तसं पहायला गेलं तर पोलिसांच्या प्रश्नांच्या माध्यमातून हरवत चाललेल्या माणूसकीबद्दलही या सिनेमातून भाष्य करण्यात आल्याचं नाकारता येणार नाही. दिग्दर्शक समीर पाटील यांच्या ‘पोश्टर बॉईज’ आणि ‘पोश्टर गर्ल’ या दोन लोकप्रिय सिनेमांनंतर ‘शेंटिमेंटल’ हा खळखळून हसवत विचार करायला लावणारा सिनेमा घेऊन आले आहेत. कॉमेडी आणि गंभीर समस्या हे समीकरण त्यांना चांगलं जमून आलं आहे.

समीर पाटील यांचे आधीचे दोन्ही सिनेमे असेच हसवत हसवत विचार करायला लावणारे, समस्या मांडणारे, व्यवस्थेला कानशिलात लगावणारे होते. त्याच जातकुळीचा ‘शेंटिमेंटल’ हा सिनेमा म्हणता येईल. मात्र जे त्या दोन्ही सिनेमात जरा जरा राहून गेलं होतं. ते या सिनेमात सही पकडलं गेलं आहे. मुळात कॉमेडीच्या माध्यमातून एखादा गंभीर प्रश्न पडद्यावर मांडणे हे समीकरणच फार कठिण वाटतं. या दोन्ही गोष्टींची सरमिसळ योग्य जमली तर ठिक नाहीतर ही भट्टी फिस्कटल्याचं अनेकदा बघायला मिळतं. या सिनेमात या दोन्ही गोष्टींची सांगड फारच चांगली साधली आहे. आपण सिनेमाची सुरूवात झाल्यापासून ते शेवटपर्यंत पोट धरून हसतो आणि त्यासोबतच पोलीस डिपार्टमेंटबद्दलचंही वास्तव समोर येतं.

ही कथा आहे मुंबईतील तीन पोलीसांची. त्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद घोडके (अशोक सराफ), सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर(उपेंद्र लिमये) आणि पोलीस निरीक्षक सुभाष जाधव(विकास पाटील) यांचा समावेश आहे. या सर्वांच्या पर्सनल आयुष्यालाही यात रेखाटण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्यातील माणूस म्हणून विविध पैलू उलगडले जातात. तसेच ते एका चोरीचा छडा लावण्याच्या मिशनवर आहेत. या चोराला ते कसे पकडतात? त्यानंतर काय होतं? ते बिहारमध्ये जाऊन काय गोंधळ घालतात? हे या सिनेमात आहे. प्रल्हाद घोडके यांची १ वर्षावर निवृत्ती आली आहे. तर दिलीप ठाकूर पैसे खाणे, दारू पिणे आणि बायकोच्या छळाला बळी पडणे यात अडकलाय तर विकास हा एमपीएससी देऊन या खात्यात आलेला तरूण. त्याला काहीतरी करून दाखवायचंय म्हणून तो या खात्यात आलाय खरा पण इकडे आल्यावर चित्र काही औरच असतं. त्याची एक लव्हस्टोरीही यात आहे. या सर्वाहूनही आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमातून आपल्याला माहिती नसलेला पोलीस जाणून घेता येतो. जी एक इमेज आपल्यात पोलिसांबद्द्दल तयार झालीये ती काहीशी त्यामुळे पुसलीही जाऊ शकते.

दिग्दर्शक समीर पाटील यांनी हा विषय मांडण्यासाठी जी काही पद्धत निवडलीये ना ती फारच क्लास आहे. कारण यात केवळ एक सरधोपट कथानक समोर मांडलं जातं, असं नाहीतर माणसही उलगडून दाखवण्यात आली आहेत. त्यांचे स्वभाव, त्यांचे विचार फारच बारीक बारीक निरीक्षणांमधून रेखाटण्यात आले आहेत. दिग्दर्शन, कथा, पटकथा आणि संवाद या जबाबदा-या त्यांनी फारच लिलया पेलल्या आहेत. डायलॉग्स तर फारच धमाल झाले आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच मराठी सिनेमा बिहारमध्ये जाऊन शूट करण्यात आला. पण त्यामुळे जराही विषयांतर होऊ दिलं गेलं नाहीये. त्यासोबतच विनाकारण विनोद यात घुसडण्यात आलेले नाहीये. जे येतात ते सीननुसार, प्रसंगानुसार येतात. त्यामुळे त्याची मजा अधिक जास्त घेता येते. कुठेही विनोद करायचाय म्हणून विनोद आढळत नाही. ही सुद्धा तितकीच महत्वाची बाब. समीर पाटील यांनी या सिनेमासाठी केलेलं कास्टींग हे फारच परफेक्ट झालंय.

Shentimental

अशोक सराफ यांनी याआधीही अनेक सिनेमांमध्ये पोलिसाची भूमिका साकारली आहे मात्र या सिनेमातील त्यांची भूमिका सोने पे सुहागा अशीच म्हणता येईल. कारण आधीच्या भूमिकांचा जराही टच या भूमिकेत दिसत नाही. मामांनी आपल्या हावभावातून, हातवा-यातून जास्त अभिनय केलाय. त्यासोबतच उपेंद्र लिमये यांनी साकारलेली भूमिकाही सर्वांना आश्चर्यचकीत करणारी आहे. कारण आतापर्यंत त्यांनी अशी भूमिका केली नव्हती. त्यामुळे ब-याच दिवसांनी त्यांची भूमिका आनंद देणारी ठरली. त्यासोबतच विकास पाटील, पल्लवी पाटील, सुयोग गोऱ्हे, रघुबीर यादव, रमेश वाणी, माधव अभ्यंकर, पुष्कर श्रोत्री, विद्याधर जोशी या सर्वांनी आपल्या भूमिका चोख साकारल्या आहेत.

मिलिंद जोशी यांनी संगीत दिलेली या सिनेमातील सर्वच गाणी झक्कास झाली आहेत. खासकरून पहिलं पोलिस स्टेशनमधील स्वप्नातील गाणं. यात गंमतीशीरपणे पोलिसांचं जगणं दाखवण्यात आलं आहे. या गाण्याचा असा प्रयोग करणं कौतुकास्पद आहे. त्यानंतरचं आयटम नंबरही चांगला झालंय. पण जर फॅमिलीसोबत सिनेमा बघाल तर अवघडल्यासारखं होईल. प्रसिद्ध सिनेमटोग्राफर महेश लिमये यांच्या नजरेतून सिनेमा दिसलाही खूप क्लास. खासकरून बिहारमध्ये गेल्यावरही तिथला रॉनेसही चांगला कॅप्चर झालाय. जयंत जठार यांनी केलेलं एडीटींगही मस्त झालंय.

एकंदर काय तर मनोरंजनासोबत डोळ्यात अंजन घालणाराही हा सिनेमा आहे. याची महत्वाची गोष्ट म्हणजे हा सिनेमा आपलं पैसा वसून मनोरंजन करतो. काही प्रश्न पडतील पण मुळात सिनेमाचा मनोरंजन करण्याचा उद्देश सफल होतो. अशोक सराफ यांची आणखी एक माईलस्टोन भूमिका नेहमीसाठी लक्षात राहिल अशीच झाली आहे. खळखळून हसाण्यासोबतच जर तुम्हाला एक महत्वाचा विषय जाणून घेता येणार असेल तर त्यात विचार करण्यासारखं काहीच नाहीये. आवर्जून बघावा असा हा सिनेमा आहे.

रेटींग- 3.5 स्टार