आशयविषय, सादरीकरणाच्या चौकटी मोडून आता मराठी चित्रपट नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. नवनवी लोकेशन्स आणि त्या अनुषंगानं कथानकाची मांडणी हे मराठी चित्रपटाचं वैशिष्ट्य अधोरेखित होऊ लागलं आहे.स्वरूप समर्थ एंटरटेन्मेन्टच्या योगेश निवृत्ती भालेराव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शक प्रकाश कुंटे आता मराठी चित्रपटाला हंपीच्या वाटेवर घेऊन जाणार आहे. या नव्या चित्रपटाचं नाव अद्याप ठरलेलं नसून चित्रीकरण कर्नाटकातल्या ऐतिहासिक हंपी इथे नुकतेच सुरु झाले आहे.

प्रकाशनं दिग्दर्शित केलेल्या “कॉफी आणि बरंच काही”, “अँड जरा हटके” या चित्रपटांना प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली होती, तसंच या चित्रपटांचं कौतुकही झालं होतं. प्रकाशच्या या नव्या चित्रपटाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. मात्र अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी अभिनेता प्रियदर्शन जाधव, ललित प्रभाकर अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. एका मुलीचा भावनिक प्रवास या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे. या चित्रपटाबाबतचे बाकी तपशील लवकरच जाहीर केले जाणार आहेत.अमलेंदु चौधरी हे या चित्रपटासाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहत आहेत.

‘चित्रीकरणासाठी तीच-तीच लोकेशन घेण्यापेक्षा नवा परिसर दाखवणं मला आवश्यक वाटतं. या चित्रपटाचं कथानक हंपीमध्येच घडतं. त्यामुळे मला चित्रीकरणासाठी हंपीचाच विचार करावा लागला. हंपी या ठिकाणाला ऐतिहासिक संदर्भ तर आहेच तसंच हे ठिकाण कथानकाचा एक भाग आहे त्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच एक वेगळं कथानक पहायला मिळेल,’ असं दिग्दर्शक प्रकाश कुंटेन सांगितलं.