(Image Credit: Indian express)

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या रंगल्या आहेत. अशातच आणखी एक स्टार किडची बॉलिवूड एन्ट्री चर्चेत आली आहे. सुनील शेट्टी याचा २१ वर्षीय मुलगा अहान हा सुद्धा रूपेरी पडद्यावर धमाका करण्यास सज्ज झाला आहे. सुनील शेट्टीची मुलगी आथिया तर बॉलिवूडमध्ये आली आहेच आता त्याचा मुलगा काय रंग उधळतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सुनील शेट्टी हा बॉलिवुडच्या अनेक अ‍ॅक्शन सिनेमांमध्ये दिसला. त्याचे अनेक सिनेमे लोकप्रिय आहेत. अशातच सुनीलचा मुलगा अहान हा सुद्धा अ‍ॅक्शन सिनेमातून एन्ट्री घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. साजिद नाडियाडवाला याने सुनील शेट्टीच्या मुलाला अहानला लॉन्च करण्याची जबाबदारी घेतली आहे.

साजिद नाडियाडवाला अहानसाठी सिनेमाची निर्मिती करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अहान बॉडी बनवण्याच्या तयारीला लागला आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अहानच्या प्रोसेसमुळे साजिद चांगलाच आनंदी आहे. अहानला पुढच्या ट्रेनिंगसाठी लंडनला पाठवण्यात आलं आहे.

एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अहान हा अ‍ॅक्शन स्पेशालिस्टकडून ट्रेनिंग घेतोय. तो मार्शल आर्ट शिकणार आहे. अहान लंडनमध्ये सहा महिने राहणार आहे. तर त्याच्या सिनेमाची घोषणा सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.