नवी दिल्ली: बांगलादेशातून किंवा भूतानमधून जरी उपचारासाठी भारतात येणा-या पेशंटची संख्या बरीच असली तरी भारतापेक्षा भूतान आणि बांगलादेशातील आरोग्यसेवा चांगली असल्याचं एका अहवालातून स्पष्ट झालं आहे. ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिस’ने गुरुवारी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. 25 वर्षांत पहिल्यांदाच भारताचा आरोग्य सेवा निर्देशांक शेजारील देशांपेक्षा कमी असल्याचे समोर आले आहे. भारतापेक्षा बांगलादेश, भूतान, श्रीलंका, चीन या देशांचा आरोग्यसेवा निर्देशांक चांगला असल्याचं यात म्हटलं आहे.

1990-2015 दरम्यानच्या कालावधीचा विचार करून हा अहवाल तयार केला आहे. यात 195 देशांच्या आरोग्य दराचा आढावा घेण्यात आला आहे. या कालावधीत आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रगतीपथावर असलेल्या भारत देशाला आरोग्याच्या बाबतीतील ध्येय गाठता न आल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या अहवालानुसार गेल्या 25 वर्षांमध्ये भारताच्या आरोग्य दरामध्ये 14.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

(एकलकोंडे राहात असाल तर तुमची उडू शकते झोप…)

1990 मध्ये 30.7 टक्क्यांवर असलेला आरोग्य निर्देशांक 2015 मध्ये 44.8 टक्क्यांवर पोहोचला होता. पण, इतर आशियाई देशांचा आरोग्य सेवा निर्देशांक पाहता ही भारताची कामगिरी सुमार असल्याचे लक्षात येत आहे. ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिस’च्या अहवालात नमूद केल्यानुसार, श्रीलंकेचा आरोग्यसेवा निर्देशांक 72.8 टक्के, बांग्लादेशचा 51.7 टक्के, भुतानचा 52.7 टक्के आणि नेपाळचा 50.8 टक्के इतका आहे. हृदयरोगाशी निगडीत विकारांवरील उपायांमध्ये भारत 25 व्या स्थानी आहे. तर, क्षयरोगाच्या उपचारांच्या बाबतीत भारत 26 व्या स्थानी आहे.