नवी दिल्ली – सर्जिकल स्ट्राइकचा जोरदार झटका दिल्यानंतर आता कुलभूषण जाधव खटल्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची गोची झाली आहे. या सर्वांमुळे बिथरलेल्या पाककडून दहशतवादी हल्ला आणि सीमेवर गोळीबार सुरुच आहे. यापार्श्वभूमीवर भारताचे हवाई दल प्रमुख बी. एस. धन्वा यांनी पत्र लिहून अधिका-यांना सांगितलं आहे की, कोणत्याही ऑपरेशनसाठी अचानकपणे बोलावलं जाईल.

भारतीय वायुदलाचे प्रमुख बी एस धनोआ यांनी 12000 अधिकाऱ्यांना पत्र लिहून कळवलं आहे की, “तयार राहा. कोणत्याही ऑपरेशनसाठी अचानकपणे बोलावलं जाईल”. हवाई दल प्रमुखांनी 30 मार्चला हे पत्र लिहिले आहे. लैंगिच छळ आणि आपसातील वाद यासह इतर अनेक मुद्द्यांचा या पत्रात उल्लेख आहे. इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

बी एस धनोआ यांनी वायुसेना प्रमुखपदाची जबाबदारी घेतल्यानंतर सुमारे तीन महिन्यानंतर म्हणजेच 30 मार्चला एक पत्र सर्व अधिका-यांना पाठवलं. हवाई दलाकडे आवश्यक असलेल्या संख्येत लढाऊ विमानं नाहीत. यामुळे मर्यादित साधनांच्या दृष्टीने सर्वांनी सज्ज राहावं, असा सांकेतीक इशारा पत्रातून देण्यात आला आहे. (हे पण पाहा: बिथरलेल्या पाकिस्तानने भारताचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने केली ‘बॅट’ तैनात)

बी एस धनोआ यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या गोळीबाराकडे लक्ष वेधलं आहे. याआधी 1 मे 1950 रोजी तत्कालीन लष्करप्रमुख के एम करिअप्पा आणि 1 फेब्रुवारी 1986 रोजी लष्करप्रमुख के. सुंदरजी यांनी अशाच प्रकारचं पत्र लिहिलं होतं.