नवी दिल्ली: वादग्रस्त स्वामी ओम आणि वाद यांचं नातं जुनं आहे. बिग बॉसमध्येही रोज नवीन वाद ओढवून त्यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. ते कुठंही गेले तरी वाद त्यांची साथ सोडत नाही. गेल्या शुक्रवारी त्यांच्यावर एका वादामुळे त्यांच्यावर प्रसाद खाण्याची वेळ आली. केवळ त्यांना चोप देण्यावरच लोक थांबले नाही, तर त्यांच्या गाडीची तोडफोडही करण्यात आली.

एका वेबसाईनं दिलेल्या वृत्तानुसार, स्वामी ओम दिल्लीतील विकास नगरमध्ये नथ्थूराम गोडसे जयंतीच्या कार्यक्रमात गेले होते. त्यावेळी आयोजकांनी त्यांना स्वागतासाठी स्टेजवर बोलवलं. त्यावेळी तिथं उपस्थित असलेले काही लोक भडकले आणि त्यांनी स्वामी ओम यांना स्टेजवर बोलवण्याचा विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की ओमसारख्या वादग्रस्त व्यक्तीला अशा स्टेजवर बोलवणं हा नथ्थूराम गोडसेचा अपमान आहे.

लोक केवळ इतक्यावरच थांबले नाही,  तर त्यांना लोकांनी चहू बाजुंनी विरोध करायला सुरुवात केली आणि त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. लोकांचा विरोध बघून त्यांनी स्टेजवरून काढता पाय काढला. तिथून ते थेट त्यांच्या कारच्या दिशेनं निघाले. तेव्हा लोकांनी त्यांना धक्काबुक्की केली. जेव्हा ते कारमध्ये बसले तेव्हा लोकांनी त्यांच्या कारला घेराव घातला. एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक सुरू केली. यात त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर जखमी झाला आहे.

(स्वामी ओम म्हणाले या ऍक्टरला झाला आहे एड्स..)

याआधीही स्वामी ओम यांना चोप मिळाला आहे. एका टीव्ही चॅनलवरच्या कार्यक्रमात एका महिला प्रेक्षकांसोबत अभद्र वर्तण केल्यामुळे त्यांना चांगलाच चोप देण्यात आला होता. तसंच नोएडामध्ये एका चॅनलच्या कार्यक्रमादरम्यान स्वामींनी केलेल्या वक्तव्यामुळे तिथं असलेले प्रेक्षक इतके भडकले की कार्यक्रमा दरम्यानच त्यांच्यात आणि प्रेक्षकांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली होती.