बंगळुरु – मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या वाहनांचा ताफा रस्त्यावरुन जात असताना त्यांना रस्ता मोकळाकरुन दिला जातो हे चित्र तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा एका घटनेसंदर्भात सांगणार आहोत ज्यात एका वाहतूक पोलिसाने चक्क राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या गाड्यांचा ताफाच अडवला आहे.

बंगळुरुतील वाहतूक पोलिसांत उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले एस. एच. निजलिंगाप्पा यांनी माणुसकीचं दर्शन घडवत रुग्णवाहिकेसाठी रस्ता उपलब्ध करुन दिला. शनिवारी बंगलुरुतील ट्रिनिटी सर्कल परिसरातून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या वाहनांचा ताफा जाणार होता. मात्र, तेवढ्यात निजलिंगाप्पा यांना एक रुग्णवाहिका गर्दीतून वाट काढण्याचा प्रयत्न करताना दिसली. यानंतर निजलिंगाप्पा यांनी रुग्णवाहिकेला गर्दीतून जागा करुन दिली.

एस. एच. निजलिंगाप्पा यांनी राष्ट्रपतींचा ताफा रोखला आणि रुग्णावाहिकेला वाट दिली. यानंतर ही रुग्णवाहिका जवळील रुग्णालयात पोहोचली. एका रुग्णाचा जीव वाचावा म्हणून राष्ट्रपतींच्या गाडीचा ताफा रोखण्याचं धाडस एस. एच. निजलिंगाप्पा यांनी दाखवलं.

एस. एच. निजलिंगाप्पा यांनी केलेल्या या कृत्यामुळे बंगळुरुच्या वाहतूक पोलिस पूर्व विभागाचे उपायुक्त अभय गोयल यांनी ट्वीट करुन त्यांचं अभिनंदन केलं आहे.

वाहूतक पोलिसात उपनिरीक्षक असलेल्या एस. एच. निजलिंगाप्पा यांनी केलेल्या या कृत्यासंदर्भातली माहिती सोशल मीडियात वा-यासारखी पसरली. त्यानंतर त्यांच्या या साहसी कृत्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.