पाटणा: देशभरात निवडणुकांचे फड जिंकत चौखूर उधळलेला भाजपचा वारू बिहारमध्ये रोखून धरणाऱ्या महाआघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी असलेला नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड (जेडीयु) हा लालू प्रसाद यादवांच्या जनता दलाशी काडीमोड घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जेडीयुने वेगळी भूमिका घेतली होती. दरम्यान महाआघाडीत फाटाफूट झाल्यास मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. परंतु, मध्यावधीसाठी भाजप तयार नसल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सत्तेसाठी जेडीयु भाजपसोबतही घरोबा करू शकते.

दरम्यान, नितीश कुमार यांनी सुरूवातीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर विरोधक अशी प्रतिमा बनवली होती. मात्र, असे असले तरी, भाजपशी त्यांनी नेहमीच सलोख्याचे संबंध ठेवले आहेत. त्यातच आयकर विभागाने लालू प्रसांद यांचे चिरंजीव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यांदव यांच्या घरावर छापे टाकले. त्यामुळे जनमानसात लालू यादव यांच्या जनता दलाची प्रतिमा अधिकच मलीन झाल्याची सरकारमध्ये भावना आहे. या प्रतिमेमुळे सरकारबाबत जनतेच्या मनात चुकीचा संदेश जाऊ शकतो, हे नितीश कुमार यांना माहित आहे. त्यामुळे नितीश कुमार उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. ज्याला जनता दलाचा विरोध असणे स्वाभावीक आहे. दरम्यान, लालूप्रसाद हे बदली आणि बढतीसाठी नितीश कुमार यांच्यावर दबाव टाकतात, अशीही चर्चा आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून महाआघाडीत बिघाडी होण्याची जोरदार शक्यता आहे.(हेही वाचा, मोहन भागवतांना दहशतवादी ठरविण्याचा यूपीएचा होता प्रयत्न)

बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल

पक्षसंख्याबळ
राष्ट्रीय जनता दल80
संयुक्त जनता दल71
कॉंग्रेस27
भाजप53
इतर12
एकुण243

दरम्यान, बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार रहावे यासाठी कॉंग्रेसही प्रयत्नशिल आहे. यासाठी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, महाआघाडी फुटली तर, सरकार कोसळेस आणि मध्यावधी निवडणुका लागतील अशी शक्यता काही राजकीय अभ्यासकांनी वर्तवली आहे. मात्र, मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी पक्ष तयार नाही, त्याचा बिहार राज्याला कोणताही फायदा होणार नसल्याचे, बिहारमधील भाजपचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी म्हटलेआहे. त्यामुळे बिहारमधील राजकारण कासे वळण घेते याबाबत उत्सुकता आहे.