मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची ही वार्ता. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतील १०,९४७ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एमयुटीपीच्या फेज 3 ला मंजुरी दिली. नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर एमयूटीपी ३ म्हणजे मुंबई नागरी परिवहन प्रकल्प फेज ३ ला मोदींनी परवानगी दिली आहे. मुंबईतील महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च ८हजार ६७९ कोटी रुपये असून पाच वर्षांच्या काळात हा खर्च १० हजार ९४७ कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

वाढत्या गर्दीमुळे पनवेल-कर्जत या २८ किमी पट्ट्यात नवा उपनगरी मार्ग, ऐरोली-कळवा या तीन किलोमीटर मार्गाचा एलिव्हेटेड कॉरिडॉर, विरार-डहाणू रोड या ६३ किमी मार्गाचं चौपदरीकरण, ५६५ नवीन कोचेसची खरेदी इत्यादी गोष्टींचा समावेश यात होतो. पश्चिम रेल्वे मार्गावर तसंच मध्य रेल्वेवर काही रेल्वे मार्गाचं विकासकार्य या प्रकल्पाअंतर्गत होईल. विरार डहाणू, कर्जत पनवेल मार्ग तसंच कळवा ऐरोली दरम्यान नवा मार्ग उभारण्यात येईल. या प्रकल्पाचा मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे.