नवी दिल्ली – एनडीएने राष्ट्रपती पदासाठी रामनाथ कोविंद यांना आपले उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. यानंतर आता काँग्रेसप्रणीत यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी जाहीर करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेसतर्फे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार या प्रबळ दावेदार असल्याचं मानलं जात आहे.

एनडीएने राष्ट्रपती पदासाठी दलित उमेदवार दिल्यामुळे संयुक्त पुरोगामी आघाडीने म्हणजेच यूपीए देखील आपल्यातर्फे दलित उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. मीरा कुमार दलित समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्या माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या कन्या आहेत.

एनडीएने राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देण्यात आलेले बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांना सर्वच मित्रपक्षांचा पाठिंबा असल्याचे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी घोषित केले आहे. मात्र, एनडीएचा हा निर्णय एकतर्फी असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. भाजपने राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी, कोअर कमिटी स्थापन केली होती. या कमिटीच्या सदस्यांनी सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. मात्र, आमच्यासोबत झालेल्या बैठकीत कोणतेही नाव कोअर कमिटीने आम्हाला सांगितले नाही आणि आता थेट नावाची घोषणा केली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. (हे पण पाहा: कोण आहेत भाजपचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद ?)

दलित चेहरा असल्यामुळे कोविंद यांच्या उमेदवारीला विरोध होणार नाही असे बोलले जात आहे. तर, विरोधी पक्षातर्फे राष्ट्रपतीपदासाठी कोण उमेदवार असेल याचा निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी 22 जून रोजी जाहीर करणार आहेत.