नवी दिल्ली: नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारने काही ठिकाणी ५०० आणि १०००च्या नोटा चालवण्याची मुभा दिली होती आता ही मुभा उद्यापासून बंद होणार आहे. पेट्रोलपंप आणि टोलनाक्यांवर ५००च्या जुन्या नोटा स्विकारण्याची मुभा १५ डिसेंबरपर्यंत वाढवली होती. मात्र, या नोटांमुळे नव्या नोटांच्या वितरणात अडथळे येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता सरकारकडून आता ५०० रूपयांच्या जुन्या नोटा कायमच्या हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (हे पण वाचा: टोलनाक्यांवर आता पैशांऐवजी ५ ते १०० शंभर रूपयांपर्यंतची कुपन्स)

नोटाबंदीनंतर उडालेल्या गोंधळामुले सरकारने नागरिकांच्या सोयीसाठी काही ठिकाणी जुन्या नोटा वापरण्याची मुभा दिली होती. मात्र, त्यानंतर अनेकजणांकडून यातही शाळा केली जात होती. अनेकजण केवळ जुन्या नोटा बदलून घेण्यासाठीच या सोयीचा वापर केला जात असल्याचे दिसून आले. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आमच्याकडे ५०० रूपयांच्या जुन्या नोटा स्विकारण्यासाठी दिलेली मुभा रद्द करण्यात यावी, असा प्रस्ताव आला होता. त्यामुळे बहुतांश नागरिकांना नव्या नोटा मिळत नव्हत्या, अशी माहिती प्रशासनातील एका अधिकाऱ्याने दिली.

सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांची आणखी गैरसोय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मासिक पगाराच्या दिवशी लोकांना पैसे मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. आज संध्याकाळपासून अतिरिक्त प्रमाणात पैसे पाठवले जातील, अशी माहितीही सूत्रांकडून देण्यात आली.

केंद्रापाठोपाठ राज्य सरकारनेही राज्य मार्गावरील टोलमाफीची मुदत २ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफी करण्यात आली होती. त्यानंतर १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु चलन समस्या सुटत नसल्यामुळे पुन्हा १८ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवली होती. त्यात बदल करत पुन्हा २४ नोव्हेंबरपर्यंत टोलमाफीचा कालावधी वाढवला होता.