नवी दिल्ली – दिल्लीमध्ये राहत असलेल्या एका वृद्ध इसमाला नोटाबंदीमुळे फटका बसल्याचं समोर आलं आहे. नोएडा येथील मजुरीचे काम करणा-या वृद्ध इसमाच्या पत्नीचे दिर्घ आजाराने निधन झाले. मात्र, अंत्यसंस्कारासाठी त्यांना बँकेतून पैसे न मिळाल्यामुळे दोन दिवस त्यांच्या पत्नीवर अंत्यसंस्कार होऊ शकले नाही.

मृत महिलेचे नाव फुलमती देवी असे असून उपचारादरम्यान सोमवारी त्यांचे निधन झाले. फुलमती देवी यांच्या कुटूंबियांकडे असलेली रोख रक्कम त्यांच्यावर रुग्णालयात खर्च झाली. बॅंकेतील खात्यावर १६ हजार रुपये शिल्लक होते. अंत्यसंस्कारानंतर फुलमती यांचा मुलगा बँकेत पैसे काढण्यासाठी गेला मात्र, बँकेत पैसे नसल्याचे सांगून त्याला रिकाम्या हातीच परतावे लागले. यानंतर मंगळवारी पुन्हा फुलमती यांचा मुलगा सकाळी बँकेत गेला त्यावेळी सुद्धा बँकेत पैसे नसल्याचे कारण सांगण्यात आले. (हे पण पाहा: जनधन खात्यातून महिन्याला फक्त १० हजार काढण्याची मर्यादा)

या घटनेनंतर संतप्त झालेल्या फुलमती देवी यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या मृतदेहासोबत बँकेसमोरच आंदोलन करण्यास सुरुवात केली. तसेच जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असेही सांगितले. या संपूर्ण प्रकाराची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी अंत्यसंस्कारासाठी २००० रुपये दिले. यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.