नवी दिल्ली: EVM  मशीन्स हॅक करून दाखवाच, असे थेट आव्हान निवडणुक आयोगाने दिले आहे. तसेच, यापुढच्या सर्व निवडणुका EVM आणि VVPAT मशीन्सनेच होतील असंही, निवडणुक आयोगाने ठासून सांगितले आहे. भारतीय जनता पक्षास देशभरात मिळालेले यश आणि त्या निवडणुकांमध्ये करण्यात आलेला EVM  मशीन्सचा वापर यांवरून देशभर वाद, चर्चा आणि अफवांचा महापूर आला आहे. त्यामुळे या सर्वांवर मुख्य निवडणुक आयुक्त डॉ. नसीम झैदी यांनी पत्रकार परिषद घेऊन शनिवारी स्पष्टीकरण दिले.

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन्समध्ये फेरफार झाल्याचा दावा काही उमेदवार आणि काही राजकीय पक्षांनी केला होता. त्याबाबत निवडणुक आयोगाकडे आलेल्या तक्रारीही करण्यात आल्या होत्या. मात्र, या घटनांमध्ये ईव्हीएम मशीन हॅक झाल्याची सज्जड पुरावे मिळालेले नाहीत असं मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी म्हटले आहे.

इव्हीएम मशिन्समध्ये करण्यात येणाऱ्या फेरफाराबद्धल बोलताना झैदी म्हणाले, ‘आपल्याकडे वापर करण्यात येणारी ईव्हीएम ही सुरक्षित असून त्यांच्यामधलं इलेक्ट्रिकल सर्किट बदलता येत नाही. तसंच या मशीन्समध्ये फेरफार करता येत नाही आणि ते हॅक करता येत नाहीत.’ काही मंडळींनी ईव्हीएम हॅक करता येते असा दावा केला होता. मात्र, त्याऊलट ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवाच असे प्रतिआव्हान निवडणुक आयोगाने दिले आहे.

अधिक माहिती देताना झैदी म्हणाले..

निवडणुक आयोगाने दिलेलं आव्हान ३ जून २०१७ पासून राजकीय पक्षांना स्वीकारता येईल.

त्यासाठी २६ मेपर्यंत राज्य किंवा देशपातळीवरच्या राजकीय पक्षांना त्यांची इच्छा निवडणूक आयोगाला कळवावी लागेल.

राजकीय पक्ष त्यांच्यातर्फे ३ अधिकृत प्रतिनिधी पाठवू शकतात आणि या तीन प्रतिनिधींना ईव्हीएम मशीन हॅक करायचा प्रयत्न करता येईल.

मात्र, निवडणूक आयोगाच्या नियमांच्या अधीन राहूनच या प्रतिनिधींना ईव्हीएम हॅक कराय करायचा प्रयत्न करता येईल. हे नियम जर राजकीय पक्षांनी भंग केले तर त्यांचा  हा प्रयत्न बाद ठरवला जाईल.