तुम्ही वापरत असलेल्या मोबाईल एप्लीकेशनमधून तुमची वैयक्तिक माहिती लीक होत असल्याचे वृत्त नुकतेच आले आहे. त्यामुळे वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगाची काळी बाजू सर्वांसमोर येत आहे. अशाच एका वाईट प्रकाराचा फटका खुद्द फेसबुकच्या कर्मचाऱ्यांनाच बसला आहे. जगभरात लोकप्रिय असलेल्या फेसबुकने स्वत:च्याच कर्मचाऱ्यांची माहिती संशयित दहशतवाद्यांना दिल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती समोर येते आहे. ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राने या संदर्भातील वृत्त दिले आहे. तांत्रिक बिघाडामुळे फेसबुकच्या २२ विभागांमधील तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांची माहिती संशयित दहशतवाद्यांना मिळाली असल्याचे यात म्हटले आहे.

फेसबुकच्या एक हजार कर्मचाऱ्यांची माहिती संशयित दहशतवाद्यांना मिळाली आहे. हे सर्व कर्मचारी दहशतवाद्यांचा प्रचार-प्रसार आणि अश्लिल पोस्ट रोखण्याचे काम करतात. सॉफ्टवेअरमध्ये असणाऱ्या बगमुळे या कर्मचाऱ्यांचीच माहिती लीक झाली आहे. विशेष म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांनी संशयित दहशतवाद्यांना फेसबुकवर बॅन केले, त्याच कर्मचाऱ्यांची माहिती बॅन करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना पोहोचली आहे. या सगळ्या प्रकरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून एका कर्मचाऱ्याने राजीनामा देत घरचा रस्ता धरला आहे.  (तुमच्या मोबाईलमधले अॅप लिक करतात तुमची वैयक्तिक माहीती)

फेसबुकने नोव्हेंबरमध्ये तांत्रिक बिघाड दुरुस्त केला होता. मात्र तो बिघाड कायम राहिल्याने कर्मचाऱ्यांची माहिती संशयित दहशतवाद्यांना मिळाली. वाढत्या दहशतवादाला पायबंद घालण्यासाठी आणि त्यासंदर्भातील पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी फेसबुकने विशेष सुविधा सुरु केली आहे. यानंतर फेसबुकने संबंधित कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवली आहे.

त्या पोस्ट फेसबुक करणार डिलीट

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या, भावना भडकावणाऱ्या पोस्ट फेसबुककडून डिलीट केल्या जाणार आहेत. त्याबद्दलच्या तंत्रज्ञानादरम्यानच फेसबुककडून कर्मचाऱ्यांची माहिती लीक झाली. फेसबुकनेदेखील चूक झाल्याचे मान्य केले असून असा प्रकार टाळण्यासाठी तांत्रिक बदल करु, असे म्हटले आहे.