म्हैसूर:  माझे नाव सिद्ध राम आहे. मी 100 टक्के हिंदू आहे. पण, मी भाजपसारखं हिंदूत्वाचं राजकारण करीत नाही. भाजपकडून काहीही कारण नसतानाही हिदुत्त्वाचे राजकारण केलं जात आहे. मी भाजपवाल्यांसारखं फूट पाडण्याचं राजकारण करीत नाही, अशा थेट शब्दांत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. कर्नाटकमध्ये आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये सत्ता मिळविण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, भाजपने उत्तर प्रदेशमध्ये हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावर सत्ता मिळवली पण, आपण कर्नाटकमध्ये मात्र भाजपचा हा प्रयोग यशस्वी होऊ देणार नसल्याचे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.

पूढच्या वर्षी म्हणजेच 2018 मध्ये कर्नाटक राज्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यंकडून केल्या जाणार्या कर्नाटक दौऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. या दौऱ्यांमधून हिंदूत्त्वाचा अजेंडा लोकांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगतानाच आपण लवकरच राजकीय संन्यास घेणार आहोत, असेही सिद्दरामय्या यांनी म्हटले आहे. पण, राजकीय सन्यासाबाबत सिद्दरामय्या बोलले असले तरी, राजकीय संन्यास नेमका कधी घेतला जाईल याबाबत मात्र त्यांनी मौन बाळगले आहे. कर्नाटकमधले राजकारण पाहता तेथे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय कॉंग्रेस अशा दोन राष्ट्रीय पक्षांमध्येच थेट लढत होणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसते आहे. त्यामुळ दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. (हेही वाचा, मोहन भागवतांना दहशतवादी ठरविण्याचा यूपीएचा होता प्रयत्न)

दरम्यान, विधानसभा निवडणुकीबाबत कॉंग्रेसकडून अद्याप विशेष अशी मोर्चेबांधनी बाहेर आली नाही. याउलट भाजपने मात्र, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर विधानसभा निवडणुक प्रचाराची जबाबदारी टाकली आहे. दरम्यान, कर्नाटकात भाजपला यश मिळणार की नाही? हे निवडणुकांचा निकाल लागल्यावरच स्पष्ट होणार आहे. पण भाजप हिंदुत्त्वाचं राजकारण करत असल्याची टीका सिद्दरामय्या यांनी केली आहे. आता ही आरोप प्रत्यारोपाची लढाई कुठपर्यंत रंगतीय हे पाहणे मोठे मनोरंजक असणार आहे.