नवी दिल्ली – राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. बेहिशेबी संपत्ती प्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्या ज्येष्ठ कन्या मीसा भारती यांच्या संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणली आहे. त्यामुळे आता मीसा भारती यांना आता ही संपत्ती विकता येणार नाहीये. यासंदर्भातले आदेश आयकर विभागाने काढले आहेत.

बेहिशेबी संपत्ती प्रकरणी लालूप्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती आणि तिचा पती शैलेश कुमार यांना आयकर विभागाने स्पष्टीकरण देण्यासाठी आयकर कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, ते आयकर विभागाच्या कार्यालयात गैरहजर राहिले आहेत. आयकर विभागाने मीसा भारती यांना 6 जून आणि 12 जून रोजी आयकर विभागात उपस्थित राहण्यास सांगितले होते.

त्यामुळे आता मीसा भारतीला बेनामी जमिनीसंदर्भात जुलै महिन्यात आयकर विभागाच्या कार्यालयात हजर होऊन यासंदर्भातले स्पष्टीकरण द्यावे असे आदेश देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रसाद यादव याला देण्यात आलेला पेट्रोलपंपाचा परवानाही रद्द करण्यात आला होता. (संबंधित बातमी: लालूंची कन्या आणि जावयाच्या अडचणीत वाढ, इन्कम टॅक्स विभागानं पाठवला समन्स)

पेट्रोल पंपचा परवाना मिळवण्यासाठी तेजप्रताप यादव यांनी तेल कंपनीच्या अधिका-यांबरोबर एकत्र येत बनावट कागदपत्रे बनवली होती, असा आरोप बिहार भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी केला होता. त्यानंतर हा परवाना रद्द करण्यात आला होता.