मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात रेशनिंग दुकानात आग लागून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. छिंदवाडामधील बारगी गावातील रेशनिंग दुकानात रॉकेल वाटप सुरु होतं. रेशनिंग दुकानात रॉकेल वितरण केलं जात असतानाच आगीचा भडका उडाला आणि त्यानंतर ही दुर्घटना घडली असल्याचं बोललं जात आहे.

छिंदवाडामधील बारगी गावातील रेशनिंग दुकानात रॉकेल वितरण सुरु होतं. यावेळी दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणाता रांगा लागल्या होत्या. तसेच ज्या खोलीत रॉकेलचा साठा करण्यात आला होता. रॉकेल वितरण केलं जात असतानाच आगीचा भडका उडाला. सिगारेटची ठिणगी पडल्याने ही आग लागल्याचे स्थानिकांचे म्हणणं आहे.

अचानक आग लागल्यानं संपर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला होता. या संपूर्ण गदारोळात अनेक जण आतच अडकले. आगीचा भडका उडाल्याने 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, काही जण गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे.

रेशनिंग दुकानात धान्यही मोठ्या प्रमाणात होते. त्यात अरुंद जागेमुळे लोकांना बाहेर पडता आले नाही आणि ते आगीत होरपळले असे म्हटले जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.

ही आग नेमकी कशामुळे लागली? याबाबत मात्र अद्याप नेमकी माहिती मिळू शकलेली नाहीये. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजणक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.