जम्मू काश्मिरमधील नगरोटामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ जवान शहीद झाले यामध्ये दोन महाराष्ट्रातील वीरपुत्रांचा समावेश आहे. या दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराचं भरपूर नुकसान झालं असतं. मात्र जवानांच्या पत्नींनी दाखवललेलं धैर्य हे कौतुकास्पद आहे. लष्कराच्या कॉटर्समध्ये राहणाऱ्या या जवानांच्या पत्नींमुळे मोठं संकट टळलं. या दहशतवादी हल्ल्यात दोन अधिकाऱ्यांसह ७ जवान शहीद झाले. तर हल्ला करणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं.

जम्मू येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गणवेशात सीमारेषा पार करुन लष्कर तुकडीत प्रवेश मिळवला होता. लष्कर हेडक्वार्टर्सपासून फक्त तीन किमी अंतरावर दहशतवादी होते.  हेडक्वार्टर्समध्ये घुसून जवानांच्या नातेवाईकांना ओलीस ठेवण्याचा कट त्यांनी आखला होता. मात्र तिथेच राहणा-या दोन जवानांच्या पत्नींनी दाखवलेल्या शौर्यामुळे दहशतवाद्यांचा कट फसला.

आपल्या नवजात बालकांसोबत तेथे असलेल्या दोन महिलांनी दाखवलेल्या धाडसामुळे दहशतवाद्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. एका लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, दोन जवानांच्या पत्नीने धाडस दाखवत घरात असलेल्या वस्तूंच्या साह्याने क्वार्ट्समध्ये येण्याचा रस्ता बंद केला. ज्यामुळे दहशतवाद्यांना आतमध्ये येणं कठीण झालं. जर या शूर महिलांनी वेळीच हे धैर्य दाखवलं नसतं तर दहशतवाद्यांनी अनेकांना नुकसान पोहोचवलं असतं. दहशतवादी दोन बिल्डींगांमध्ये घुसले त्यानंतर जवानांनी तेथून १२ जवान, २ महिला आणि २ लहान मुलांना सुरक्षित बाहेर काढलं. यादरम्यान एक अधिकारी आणि २ जवान शहीद झाले.