नवी दिल्ली: एकीकडे देशातील सर्वच सिनेमागृहांमध्ये सिनेमा सुरू होण्याआधी राष्ट्रगीत लावणे अनिवार्य केल्यानंतर मात्र दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने एक अजब निर्णय दिला आहे. सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रगीत लावणं सक्तीचं करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे कोर्टाच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

सिनेमागृहांप्रमाणे न्यायालयांमध्येही कामकाज सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. एका वकिलानेच ही याचिका दाखल केली होती. अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी याचिकेवर सुनावणीची गरज नसल्याचं सांगितलं. मात्र ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.

सर्व चित्रपटगृहांमध्ये सिनेमा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत सक्तीचं करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. सोबतच थिएटरमध्ये राष्ट्रगीतासह पडद्यावर राष्ट्रध्वज दाखवा, असंही सांगण्यात आलं आहे. याआधी केवळ महाराष्ट्रातच सिनेमागृहात सिनेमा सुरू होण्याआधी राष्ट्रगीत अनिवार्य होतं, मात्र आता देशभरातील सर्वच सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक असेल.

इतकंच नाही तर राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभं राहणंही गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. तसंच कोणत्याही परिस्थिती अपूर्ण राष्ट्रगीत लावण्यास परवानगी नसेल, असंही न्यायालयाने नमूद केलं.