नवी दिल्ली: काल कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर आता कॉंग्रेस पक्षाचं अधिकृत अकाऊंट हॅक झाल्याचं वॄत्त आहे. हॅकर्सने राहुल गांधीच्या अकाऊंटवरुन जसे आक्षेपार्ह ट्विट केले होते, तसेच ट्विट काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आले आहेत. राहुल गांधी काल यांचं @OfficeOfRG हे ट्विटर हँडल हॅक झालं होतं. त्यानंतर आज @INCIndia हे काँग्रेसचं ट्विटर हँडल हॅक झाल्याचं काँग्रेसने सांगितलं. या दोन्ही ट्विटर हँडलवरुन अतिशय आक्षेपार्ह आणि वादग्रस्त ट्विट करण्यात आले आहेत.

कॉंग्रेसचं अधिकृत ट्विटर अकाउंट @INCIndia या नावाने आहे. आज सकाळी १० च्या सुमारास हे अकाऊंत हॅक करण्यात आलं आणि त्यावरून आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करण्यात आला. ‘ख्रिसमस स्पेशलसाठी तयार रहा. तुमच्या पक्षाला जमीनदोस्त करण्यासाठी आमच्याकडे भरपूर माहितीचा खजिना आहे’, अशाप्रकारच्या पोस्ट त्यावर टाकण्यात आला आहे. त्यानंतर लगेच या पोस्ट हटवण्यात आल्या आहेत.

राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर याप्रकरणी कॉंग्रेसकडून आज दिल्ली पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार केली आहे. कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी देशातील डिजिटल सुरक्षेवरही यानिमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याआधी कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांनीही अकाऊंत हॅकिंग प्रकरणी सरकारवर टीका केली होती.