इस्लामाबाद: भारतीय नागरिक आणि माजी लष्करी अधिकारी कुलभूषण जाधव यांची दया याचीका पाकिस्तानच्य लष्करी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. जाधव यांच्या भवितव्याचा फैसला आता पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या हातात गेले आहे. त्यामुळे जाधव यांच्या प्रकरणात काय निकाल द्यायचा यावर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जावेद बाजवा विचार करत आहेत. दरम्यान, जाधव यांच्या फाशीबाबतचा निर्णय मेरिटवरच घेतला जाईल, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, जाधव हे भारतीय नागरीक आणि पेशाने माजी लष्करी अधिकारी आहेत. मात्र, पाकिस्तानने त्यांना भारतीय गुप्तहेर असल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवत लष्करी न्यायालयासमोर त्यांच्याविरूद्ध खटलाही चालवला. या खटल्यात जाधव यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. दरम्यान, भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हस्तक्षेप करत कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती दिली. जाधव यांनीही पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याकडे दयेचा अर्ज केला होता. (हेही वाचा, पाकिस्तानच्या उलट्या बोंबा ! भारताने 7 महिन्यात 542 वेळा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन)

पाकिस्तानचे लष्करी जनसंपर्क विभागाचे प्रमुख मेजर जनरल आसिफ गफूर यांनी एका निवेदनाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, पाकच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांचे आपील फेटाळले. त्यामुळे कायद्यानुसार जाधव यांना लष्करप्रमुखांकडे दयेचा अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे म्हटले होते. दरम्यान, गफूर यांनी केलेल्या निवेदनात ‘आपण हेरगिरी व विघातक आणि दहतवादी कारवाया केल्याची कबुली देऊन त्यामुळे मोठया प्रमाणावर झालेल्या जीवितवित्तहानीबद्दल  आपल्याला पश्चात्ताप हेत आहे. त्यामुळे दयाबुद्धीने आपले प्राण वाचविण्याची विनंती जाधव यांनी लष्करप्रमुखांना केली आहे, असा दावा गफूर यांनी आपल्या निवेदनात केला आहे.