नवी दिल्ली – कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनावलेल्या शिक्षेसंदर्भात सुरु असलेल्या खटल्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकला दणका दिल्यानंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. यासाठीच पाकिस्तानने एक नवी योजना आखली असून बदला घेण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त समोर येत आहे. पाकिस्तानने LoC म्हणजेच नियंत्रण रेषेवर आपले बॉर्डर अॅक्शन टीमचे (BAT) कमांडोज तैनात केले आहेत.

पाकिस्तानने आपल्या सैन्यातील काही जवानांना क्रौर्याचे विशेष ट्रेनिंग देऊन एक टीम तयार केली आहे. या टीमला त्यांनी बॉर्डर अॅक्शन टीम म्हणजेच बॅट (BAT) असे नाव दिलं आहे. भारतीय जवानांची हत्या करणे, त्यांचे शीर पळवून नेणे अशी कामे या टीमला शिकवण्यात आली आहेत. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने या संदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे. (हे पण पाहा: कुलभूषण जाधव यांच्यासाठी ‘या’ मराठी माणसाने लढली लढाई)

कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर आतंरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती आणल्यानंतर भारतीय जवानांना टार्गेट करण्याचा प्लॅन पाकने आखला आहे. काही दिवसांपूर्वी पाकने शस्त्रसंधींचे उल्लंघन करत सीमेवर गोळीबार केल्याने त्यांचा हा कट उघडकीस आला. यावेळी भारतीय जवानांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाकचा एक एसएसजी कमांडो मारला गेला. नियंत्रण रेषेवर एवढ्या प्रशिक्षित कमांडोंच्या तैनातीने पाकचा प्लॅन उघड झाला.

पाकिस्तानने घुसखोरांच्या मार्फत कश्मीर घाटीतील नागरिकांना फितवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने बनवलेली ही टीम नियंत्रण रेषा आणि हाजी पिरच्या जवळच्या भागात भारतीय जवानांना टार्गेट करण्याच्या तयारीत आहेत.