मुंबई : फक्त ‘भाजप’ म्हणून राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकणे सोपे नाही म्हणून  मित्रपक्षांना एकत्र घेऊन ही राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली जात आहे  असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. आज राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभुमीवर त्यांनी हे विधान केले आहे. देशभरातील आमदार व खासदार या निवडणुकीसाठी मतदान करतात. प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या आकारमानानुसार मतांचे मूल्य ठरले जाते. अनेक मोठ्या राज्यांत आजही भाजपविरोधी सरकारे आहेत हे लक्षात घेतले तर या निवडणुकीतले एनडीएचे महत्त्व लक्षात येते असेही ते म्हणाले.

बाकी सर्व वाऱ्यावरची वरात..

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधी दिल्लीत एनडीएच्या सर्व घटक पक्षांची एक बैठक झाली व त्यासाठी सगळ्यांनाच सन्मानाने आमंत्रित करून प्रत्येकाचे मानपान करण्यात आले. आम्ही स्वतः या बैठकीस हजर राहून आमची भूमिका मांडली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत जन्मापासून ‘भाजपा’स सोबत करणारे फक्त दोनच पक्ष त्या बैठकीत होते ते म्हणजे शिवसेना व अकाली दल. बाकीचे जे कोणी होते ती सगळी वाऱ्यावरचीच वरात होती असेही ते म्हणाले.

राष्ट्रपती पदाची प्रतिष्ठा वाढवावी लागेल

अलीकडच्या काळात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदास प्रतिष्ठा मिळवून दिली. रामनाथ कोविंद यांना ही प्रतिष्ठा वाढवावी लागेल असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती झाल्यातच जमा आहेत. निवडणूक हीऔपचारिकता आहे असे म्हणत कोविंद यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

निवडणुक एकतर्फीच

आजची राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही आता एकतर्फीच होत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोविंद यांच्या विरोधात काँग्रेसने मीरा कुमार यांना जणू मारून मुटकूनच उभे केले आहे. बाबू जगजीवनराम यांची कन्या असलेल्या मीरा कुमार यांनी हिंदुस्थानी परराष्ट्रसेवेत काम केले आहे. केंद्रीय मंत्रीपदापासून लोकसभा अध्यक्षपदापर्यंत सर्व पदे भूषविली आहेत. त्यांना एक मोठा राजकीय वारसा लाभल्यामुळेच त्या इथपर्यंत भरारी मारू शकल्या. उलट रामनाथ कोविंद यांच्यामागे असा कोणताही वारसा नाही व एका सामान्य व्यक्तीस देशाचे सर्वोच्च पद लाभत आहे. त्यामुळे श्री. कोविंद यांच्या पुढे असलेली आव्हाने मोठी आहेत. त्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागेल व राष्ट्रपतीपदावर रबरस्टॅम्पचा जो शिक्का लागला आहे तो पुसून काढावा लागेल.  (आज होणार राष्ट्रपतीपदासाठी मतदान : कौल कोणाच्या बाजुने ?)

 कोविंद हेभ्य  साधे

कोविंद हे सभ्य व साधे आहेत. ते ‘दलित’ असल्याचा उल्लेख वारंवार केला जातो ते योग्य नाही. कर्तबगारीस जात चिकटवू नये. ते एक उत्तम मनुष्य आहेत व देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख म्हणून राष्ट्रपती भवनात जाणार आहेत. अशा राष्ट्रीय पदावरील व्यक्तीची निवड जात पाहून करणे हा सामाजिक अपराध आहे. मग ते कोविंद असोत नाहीतर मीरा कुमार याचे भान राजकारणातील सर्वोच्च व्यक्तींनी ठेवले तर नवे आदर्श निर्माण होतील नाहीतर सब घोडे बारा टके असेच पुढे चालू राहील असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.