नवी दिल्ली :  भारताचे मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यानंतर देशाच्या राष्ट्रपतीपदाची धुरा कोणाकडे जाणार याची चर्चा गेले काही महिने रंगली आहे. देशाच्या या सर्वोच्च पदासाठी आज मतदान होणार आहे. भाजपाच्या नेतृत्वातील रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचे पारडे जड मानले जात आहे. विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांच्याकडून प्रादेशिक पक्षांचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत सुरू आहे. आता थोड्याच वेळात या मतदानाला सुरुवात होणार आहे. मतांची मोजणी 20 जुलैला दिल्लीत होणार आहे. पण सध्या तरी रामनाथ कोविंद यांचे पारडे पारडे जड वाटत आहे. संसद भवन आणि राज्य विधानसभांमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. मतांचे एकूण मूल्य 10,98,882 तर उमेदवारास राष्ट्रपती होण्यासाठी 5,49,442 मते मिळणे आवश्यक आहेत.

राष्ट्रपतिपदाची ही निवडणूक संकुचित, फूटपाडू व सांप्रदायिक विचारसरणीविरुद्धची लढाई आहे. संख्याबळ आमच्याविरुद्ध असले, तरी हा लढा निकराने द्यावाच लागेल. कारण अशा लोकांच्या दावणीला देश बांधू दिला जाऊ शत नाही अशी प्रतिक्रीया कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिली. ‘या वेळची निवडणूक ऐतिहासिक आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुकीच्या प्रतिष्ठेचे भान राखले. ही आपल्या परिपक्व लोकशाहीची खरी उंची आहे. आता एकही मत वाया जाणार नाही, याची आपल्याला खात्री करायची आहे.’ असे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  (‘मोतोश्री’भेट नाहीच; पण, उद्धव ठाकरेंना कोविंदांचा फोन)

रामनाथ गोविंद यांच्याविषयी

कोविंद हे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत. मुळचे उत्तरप्रदेशच्या कानपूरचे रहिवाशी असलेले कोविंद हे भाजपमधला दलित चेहरा आहेत. ते दोन वेळेस राज्यसभेचे खासदार राहिले असून, भाजपच्या दलित मोर्च्याचे अध्यक्षही होते. ऑल इंडिया कोली समाजाचे अध्यक्ष आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ताही होते. ते पेशानं वकिल आहेत. तसेच, त्यांनी 2002 मध्ये संयुक्त राष्ट्रात भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. गृह मंत्रालयासह अनेक मंत्रालयाचे ते सदस्यही राहीले आहेत.

मीरा कुमार यांच्याविषयी

मीरा कुमार या भारताचे माजी उपपंतप्रधान आणि कॉंग्रेस नेते दिवंगत जगजीवन राम यांच्या कन्या आहेत. वयाच्या 71 व्या वर्षी त्या लोकसभेच्या अध्यक्ष बनल्या. संयुक्त पूरोगामी आगाडी (युपीए) सरकारच्या काळात (2009 ते 2014) त्यांनी लोकसभेचे अध्यक्षपद भूषवले. अत्यंत साध्या आणि मीतभाषी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीरा कुमार यांनी भारतीय विदेश सेवेत असलेली आईएफएसची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला. 1985 मध्ये त्या पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेल्या.

कोविंद यांची निवड निश्चित ?
एनडीएत शिवसेनेसोबत इतर सर्व घटक पक्षांसोबतच नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल, अण्णा द्रमुक या पक्षांनीही कोविंद यांना पाठिंबा दर्शवला आहे.  त्यामुळं त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.

रामनाथ कोविंद यांच्यासोबत असलेले घटक पक्ष

भाजपा, शिवसेना, पीडीपी, टीआरएस, अण्णाद्रमुक, वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल, जनता दल युनायटेड, तेलगु देसम पार्टी, लोकजनशक्ती पार्टी, शिरोमणी अकाली दल, एजीपी, एनपीपी, अपना दल.

मीरा कुमार  यांच्यासोबत असलेले घटक पक्ष

काँग्रेस, तृणमूल, माकपा, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी, बसपा, भाकपा, जनता दल सेक्युलर, जेएमएम, डीएमके, एआययूडीएफ