नवी मुंबई: देशभरातील सर्वच सिनेमागृहात सिनेमा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीतासह राष्ट्रध्वज दाखवण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत. सध्या महाराष्ट्रातील सिनेमागृहांमध्येच सिनेमा सुरू होण्याआधी राष्ट्रगीत म्हटले जाते. मात्र, आता हा उपक्रम देशभरातील सिनेमागृहांमध्ये राबवला जाणार आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय भावनेचा मान ठेवण्यासाठी हे केले जात आहे. यासोबतच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आता राष्ट्रगीत सुरू असताना पडद्यावर राष्ट्रीय ध्वज दाखवणेही बंधनकारक असणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून राज्यातील सिनेमागृहांमध्ये सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवलं जातं. त्यासाठी सिनेमागृहातील सर्वांनीच उभे राहणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकदा कुणी उभे राहत नाहीत. त्यामुळे अनेक वादही गेल्या काही काळात समोर आले होते. मात्र, आता ही राष्ट्रीय भावना अधिक वाढवण्यासाठी हा निर्णय अधिक महत्वाचा ठरणार आहे.

इतकंच नाही तर राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभं राहणंही गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. तसंच कोणत्याही परिस्थिती अपूर्ण राष्ट्रगीत लावण्यास परवानगी नसेल,असंही न्यायालयाने नमूद केलं.