मुंबई: भाजपने राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केल्यावर त्याला शिवसेनेने सुरूवातीला विरोध केला होता. आता शिवसेनेने उपराष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसने उमेदवारी दिलेले गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावाला आक्षेप घेतला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा आक्षेप ट्विट करून दर्शवला आहे.

‘मुंबईत १९९३ मध्ये बॉम्बस्फोट घडवणा-या याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणारे गांधी तुम्हाला उपराष्ट्रपती म्हणून चालतील का?; असा सवाल शिवसेनेनं देशवासीयांना केला आहे. त्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.


शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. गोपाळकृष्ण गांधी यांनी याकूब मेमनला फाशी होऊ नये, यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना तसं पत्रही लिहिलं होतं. हे पत्र त्यांनी जाहीरही केलं होतं. हे निदर्शनास आणत संजय राऊत यांनी गांधी यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. (हे पण वाचा: मित्रपक्षांना सोबत न घेता राष्ट्रपतीपदाची निवडणुक लढविणे भाजपला सोपे नाही)

तर एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘केवळ आडनाव ‘गांधी’ आहे म्हणून त्यांना पाठिंबा देणं योग्य नाही. देशाविरोधात युद्ध पुकारणाऱ्या याकूबला फाशी व्हावी, ही देशाची भावना होती. गोपाळकृष्ण गांधी हे त्यावेळी देशभावनेच्या विरोधात उभे राहिले होते. अशी मानसिकता असलेल्या व्यक्तीला कोणत्याही घटनात्मक पदावर बसवणं योग्य होणार नाही’.