उत्तर प्रदेश विधानसभेत दि. १२ जुलै रोजी संशयित पावडर सापडल्याने खळबळ उडाली होती. अमरनाथ हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर देशात पुन्हा मोठा कट रचण्याचा दहशतवाद्यांचा डाव असल्याची भिती व्यक्त त्यावेळी करण्यात आली होती.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांनी हा दहशतवादी कट असल्याचे म्हटले होते. पण त्या संशयित पावडरचा प्रयोगशाळेचा अहवाल आला आहे. यामध्ये ती पावडर म्हणजे स्फोटक नसल्याचा खुलासा तपास करणाऱ्या आग्रा न्यायवैद्यक प्रयोगशाळेने आपल्या अहवालात केला आहे.

 अधिकाऱ्यांनी मौन बाळगले

प्रयोगशाळेचे उपसंचालक ए.के.मित्तल यांच्या नेतृत्वाखाली या पावडरचा तपास करण्यात आला. या पथकात स्फोटकांचा तपास करणाऱ्या तज्ज्ञांचाही समावेश होता. विधानसभेत स्फोटके सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर उत्तर प्रदेश एटीएसने त्याचे नमुने आग्रा आणि हैदराबादला पाठवले होते. आग्राच्या प्रयोगशाळेने आपला अहवाल पोलीस अधिकाऱ्यांना पाठवला आहे. परंतु, सरकारने हा मुद्दा अधिक संवेदनशील करुन आक्रमकरित्या मांडल्याने यावर मोठ्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. परंतु, अधिकारी प्रयोगशाळेचा अहवाल मिळाला नसल्याचे कारण देत आहेत. (उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटक पदार्थ सापडल्याने खळबळ)

विधानसभेत ही पावडर मिळाल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांनी या घटनेची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) चौकशी करण्याची मागणी केली होती. एनआयएच्या तपासात दोषी आढळलेल्या गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले होते. सध्या एनआयए आणि उत्तर प्रदेश एटीएस याप्रकरणी तपास करत आहेत. ‘एबीपी न्यूज’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आग्रा न्यायवैद्यकच्या अहवालात म्हटले आहे की, आमदाराच्या आसनाखालून मिळालेली ही पावडर स्फोटक नाही. या पावडरच्या तपासासाठी चार वरिष्ठ वैज्ञानिकांचे पथक तैनात करण्यात आली होती.

विधानसभेत स्फोटक पदार्थ सापडणे हा गंभीर प्रकार आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. एनआयएमार्फतच याची चौकशी झाली पाहिजे असे मत मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. विधानसभेत सापडलेली स्फोटकं हा दहशतवादी हल्ल्याचा कट असून यामागे कोणाचा हात आहे याचा पर्दाफाश झालाच पाहिजे असे योगी आदित्यनाथांनी म्हटले आहे.