जम्मूमध्ये नगरोटा आणि सांबा या दोन ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. नगरोटामध्ये सेनेच्या युनिटवर २-४ दहशतवाद्यांनी सकाळी साडे पाच वाजता हल्ला केला. तर सांबामध्ये बीएसफचे जवान पेट्रोलिंगवर असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला. जम्मू काश्मीरमधील नगरोटा तालुक्यात लष्कराच्या तलावर दहशतवाद्यांनी बॉम्बने हल्ला करत युनिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांची संख्या ३- ४ असल्याची माहिती आहे. या चकमकीत सेनेचे दोन जवान शहीद झाले, तर एक जवान जखमी आहे. (जम्मूजवळ दहशतवाद्यांचा लष्करी छावणीवर हल्ला)  

दरम्यान या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नगरोटा तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय दहशतवाद्यांकडून परिसरात बॉम्बहल्लादेखील करण्यात आला आहे. या भागात दहशतवादी घुसल्याने प्रशासनाकडून शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पहाटे ५.३० च्या सुमारास दहशतवाद्यांनी नागरोटातील जवानांच्या तुकडीवर हल्ला केला. यामध्ये दोन जवान जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर भारतीय जवानांनी प्रत्तुत्तर देण्यास सुरुवात केली.

नगरोटासोबतच घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांनी बीएसएफच्या तुकडीवरही हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला तर दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं.