मुंबई – सध्या संपूर्ण देशात चर्चा होत आहे ती म्हणजे जीएसटीची. 1 जुलैपासून संपूर्ण देशात लागू होणारा हा जीएसटी आहे तरी काय? यासंदर्भात सर्वसामान्य नागरिकांपासून श्रीमंत नागरिकांना माहिती व्हावी यासाठी सरकारने एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे.

वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या प्रमोशनसाटी बॉलिवूडचे शहेनशहा म्हणजेच अभिनेते अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय जकात आणि सीमाशुल्क विभागाने अमिताभ बच्चन यांची नियुक्ती ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून केली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडिओही ट्विट केला आहे.

अर्थ मंत्रालयाने ट्विट केलेला हा व्हिडिओ 40 सेकंदाचा आहे. ‘जीएसटी- एकसंघ राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण करण्यासाठी पुढाकार’ असं कॅप्शन व्हिडिओला दिलं आहे. भारताच्या राष्ट्रध्वजातील तिरंग्यातील तीन रंगांप्रमाणे जीएसटी ही एकत्रित शक्ती असून जीएसटी ‘एक राष्ट्र, एक कर, एक बाजारपेठ’ निर्माण करण्यासाठी घेतलेला पुढाकार असल्याचा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

येत्या 1 जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे. जीएसटीमुळे देशातील अन्य कर आता संपुष्टात येणार असून एकच कर लागू होणार आहेत.