नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदासाठी मतदान झाल्यानंतर एनडीएतर्फ़े केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी ते उपराष्ट्रपतीपदाचा अर्ज दाखल करतील. एनडीएतर्फे उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि निर्मला सीतारमन यांची नावं चर्चेत असल्याचं म्हटलं जात होतं.

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी या निर्णयाची घोषणा केली. व्यंकय्या नायडू उद्या, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील, असे शहा यांनी सांगितले. आधीपासूनच पदासाठी उमेदवारी देण्याबाबत व्यंकय्या नायडू यांच्या नावाची चर्चा सुरू होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

व्यंकय्या नायडू यांचा परिचय :
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात नायडूंकडे ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी होती. दक्षिण भारतातील भाजपचे महत्वाचे नेते म्हणून व्यंकय्या नायडूंकडे पाहिलं जातं. नायडूंना 25 वर्षांपेक्षा जास्त काळाचा संसदीय कामकाजाचा अनुभव आहे. मोदी सरकारमध्ये नायडूंकडे नगरविकास मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यांनी 2002 ते 2004 या काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे(हे पण वाचा: कॉंग्रेसचे उमेदवार गांधी उपराष्ट्रपती म्हणून चालतील का ?: शिवसेना)

यूपीएकडून गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी:

काँग्रेसच्या नेतृत्वात यूपीएनेही उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराचं नाव जाहीर केलं आहे. विरोधी पक्षांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली आहे.