नवी दिल्ली – उत्तराखंडमध्ये विष्णुप्रयागजवळ भूस्खलन झाल्याने तब्बल 15 हजार यात्रेकरू अडकले आहेत. चार धाम यात्रेला सुरुवात झाल्याने उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे. मात्र, या भूस्खलनामुळे यात्रेकरू अडकले आहेत. या यात्रेकरूंमध्ये महाराष्ट्रातील 100हून अधिक यात्रेकरूंचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

चामोली जिल्ह्यातील जोशीमठ भागापासून 9 किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. या भागातील 150 मीटर परिसरात भूस्खलन झाले आहे. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हाथीपहाडवरील एक मोठी शिळा अचानक तुटून कोसळली. त्यानंतर हायवेवरील 50 मीटरचा भाग पूर्णपणे बंद झाला. हाथीपहाडमध्ये दोन्ही बाजूंना 500 हून अधिक वाहने अडकून पडली आहेत.

‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण स्थितीचा आढावा घेत आहेत. भूस्खलनामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. भूस्खलनामुळे रस्त्यावर निर्माण झालेले ढिगारे पूर्णपणे हटवण्यासाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. रस्त्यावरील मातीचा ढिगारे हटवून वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

प्रशासनाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार बद्रीनाथ धाममध्ये सुमारे 15 हजार यात्रेकरू अडकले आहेत, तर इतर काही ठिकाणांवर सुमारे 10 हजार यात्रेकरू थांबलेले आहेत. हाथीपहाडपासून ते बद्रीनाथकडे जाणा-या मार्गावर अडकलेल्या यात्रेकरूंना प्रशासनाने गोविंदघाट गुरूद्वारा येथे थांबवण्याची व्यवस्था केली आहे.