नवी दिल्ली: गोरक्षणाच्या नावाखाली जर कोणी हिंसा करत असेल तर, ते खपवून घेणार नाही. अशा हिंसक गोरक्षकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन लवकरच सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सर्वपक्षीय बैठक आज (रविवार) बोलवली होती. या बैठकीत मोदी बोलत होते. बैठकीला उपस्थित असलेले संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, आजच्या सर्वपक्षीय बैठकीत लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात संसदीय कामकाजात सहकार्य करण्याचे अवाहन केले. बैठक संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनंत कुमार यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी बैठकीत सांगितले की, गोरक्षेच्या नावावर हिंसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कायदा हातात घेण्याचा कोणालाच अधिकार नाही. तसेच, गोरक्षेच्या मुद्द्यावरून होणारी हिंसा आणि त्याचे राजकारण दोन्हीही चांगले नाही, असेही मोदी म्हणाल्याचे अनंत कुमार यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी जीएसटीबाबतही सविस्तर माहिती या बैठकीत दिली. तसेच, सर्व पक्षांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान होणाऱ्या कामकाजात सहकार्य करावे असे आवाहन केले. (हेही वाचा, नागपूरात मारहाण केलेल्या भाजपकर्त्याकडे गोमांसच होतं)

सुमित्रा महाजन यांनी बोलवलेल्या बैठकीस केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार, मुख्तार अब्बास नकवी, एस एस अहलूवालिया, अनुप्रिया पटेल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार,  कॉंग्रेसचे गुलाम नबी आजाद, ज्योतिरादित्य सिंधिया, अकाली दलाचे गुजराल, बीजेडीचे भृतहरि महताब, सीपीएमचे सीताराम येचुरी, लोजपाचे चिराग पासवान, सपाचे मुलायम सिंह, नरेश अग्रवाल, सीपीआयचे डी राजा आदी नेते सहभागी झाले होते. तसेच, राष्ट्रीय जनता दलाचे जे.पी यादव. रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) रामदास आठवले, उपेंद्र कुशवाह, फारूख अब्दुल्ला, जेडीएसचे देवेगौड़ा आदी नेते उपस्थीत होते.