पटियाला: पंजाबमध्ये एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती त्याच्या मित्रासोबत एका महिलेला हॉकीस्टिकने जबर मारहाण करत आहे. मारहाण करणारा हा व्यक्ती त्या महिलेचा दीर आहे. या महिलेला मुलगी झाली तसेच, हुंड्यातील रक्कम मिळाली नाही म्हणून तो तिला बेदम मारहाण करत असल्याचे सांगितले जात आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना 14 जुलै रोजी घडली आहे. पोलीसांनी या प्रकरणी दोघांना  अटकही केली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, महिलेचे नाव मीना कश्यप आहे. मीनाचा विवाह दलजीत सिंह नावाच्या एका व्यक्तीसोबत झाला. काही दिवसांपूर्वीच मीनाचे बाळंतपण झाले असून, तिने एका मुलीला जन्म दिला आहे. पण, मीनाचे साररचे कुटूंबिय तिला स्विकारायला तयार नाहीत.

दरम्यान, पीडित मीनाच्या वडिलांनी सांगितले की, मीनाच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. दरम्यान, तिने एका मुलीला जन्म दिला आहे. पण, केवळ मुलीला जन्म दिला म्हणून सासरकडची मडळी सात लाख रूपये मागत आहेत. दरम्यान, पोलिसांनीही या घटनेची गंभीर दखल घेतल गुन्हा दाखल करून घेतला आहे. (हेही वाचा, लोकलमध्ये सीट न दिल्याने त्याने प्रवाशाच्या डोळ्यात फेकली मिरचीपूड)

दरम्यान, काही कारणामुळे मीना पतीपासून वेगळे राहात होती. मीना राहात असलेल्या ठिकाणी तिचा दिर आला आणि त्याने अचानक मारहाण करण्यास सुरूवात केली. व्हिडिओत एक महिला खाली बसलेली दिसत असून, तिच्या आजूबाजूचे साहित्य इतस्तत: विखूरल्याचे दिसत आहे. मारहाण होताना महिला सातत्याने आरडाओरडा करत आहे. मदतीची याचना करत आहे. मात्र, तरीही तिचा दीर तिला मारहाण करत आहे.