नोटबंदीच्या निर्णयानंतर आज मध्यरात्रीपासून राज्यासह देशभरातील टोलनाके सुरू होणार आहे. नोटबंदीचा परिणाम टोल नाक्यांवर दिसत होता. आणि परिणाम ट्राफिक वाढत असल्यामुळे टोल बंद करण्यात आले होते. मात्र टोलमुक्तीमुळे कंत्राटदारांना झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून टोलवसुलीची कालमर्यादा वाढवून देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. (टोलनाक्यांवर आता पैशांऐवजी ५ ते १०० शंभर रूपयांपर्यंतची कुपन्स)  

टोलमुक्तीचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून राज्यभरासह देशभरातील राष्ट्रीय महमार्गांवर पुन्हा टोल भरावा लागणार आहे.नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यातील ६५ टोल नाक्यांवर वसुली बंद होती. राज्यात दिवसाला साडे सहा कोटी रुपयांची टोलवसुली होते. परंतु तीन आठवडे टोलवसुली बंद असल्याने कंत्राटदारांना १२५ कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

त्यामुळे कंत्राटदारांनी राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली केली. पण कंत्राटदारांना पैसे देण्याऐवजी टोलवसुलीची कालमर्यादा वाढवून देण्याचा विचार सरकार करणार आहे. मात्र ही वसुली सर्वसामान्यांच्या खिशातूनच होण्याची शक्यता आहे. राज्यातील ६५ टोल नाक्यांपैकी ५३टोलनाक्यावर लहान वाहनं वगळता जड आणि मोठ्या वाहनांकडून वसुली केली जाते. पण मुंबई एन्ट्री पॉईंट, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेसह १२ टोलनाक्यांवर सर्वच वाहनांकडून टोल घेतला जातो.

८ नोव्हेंबरनंतरच्या नोटबंदीनंतर १४,१८,२४ नोव्हेंबर आणि २ डिसेंबरपर्यंत वेळोवेळी टोलमाफी देण्यात आली.दरम्यान, पेट्रोल पंपांवर ५०० रुपयाच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय कधीही रद्द होऊ शकतो. याबाबतची घोषणा आज होण्याची शक्यता आहे.