अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील मीरा रोड भागात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका माजी सैनिकासह त्याच्या कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या झाली आहे. त्यामुळे शेवगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक चौकशी सुरू आहे.

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वॄत्तानुसार, आप्पासाहेब गोविंद हरवणे (50), सुनंदा हरवणे (45), स्नेहल (21) व मकरंद (14) अशी मृतांची नावं आहेत. लष्करातून निवृत्त झालेले आप्पासाहेब हे भूमिअभिलेख कार्यालयात नोकरीला होते. आज सकाळी हरवणे कुटुंबातील कुणीही घराबाहेर दिसले नाही. त्यामुळे गोंधळलेल्या शेजारच्यांनी चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. आप्पासाहेबांसह त्यांच्या पत्नीचे व मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. शेजाऱ्यांनी लगेचच याची माहिती पोलिसांना दिली.

चाकूनं भोसकून या सर्वांची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात पुढं आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून हत्याकांडामागच्या कारणांचा तपास सुरू केला आहे.